रविवार, दि.19 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय पुष्प दिवस पार पडला. भारतीय झाडांच्या फुलांची जंत्री निराळी व दिलखेचक आहेच (exotic flower species). तशीच बाहेरच्या देशातून आपल्या देशात असंख्य फुलझाडे आली (exotic flower species). ती इथल्या देशी फुलझाडांची जागा खातात, हे खरे असले तरी, मोजक्यांची इथे थोडक्यात ओळख करून घेऊ....(exotic flower species)
झेंडूफळ, गिरीपुष्प, गुलमोहोर, जट्रोफा यांसारख्या प्रजातींपासून ते निवडुंग, लिलींचे प्रकार अशा असंख्य विदेशी फुलझाडांनी आपण व्यापलेलो आहोत. यातील काहींनी भारताला आपले केले, तर काहींनी उपद्रव चालू केला. कारण ही फुलझाडे तणासारखी वाढली आणि स्थानिक जैवविविधतेला धोका निर्माण झाला. विदेशी फुलझाडांचे दोन भाग पडू शकतात. एक बागेत लावायच्या शोभिवंत प्रजाती व दुसरा अति प्रमाणात तण म्हणून वाढणारी विदेशी फुलझाडे.
वेडेलीया
मूळ ठिकाण - मेक्सिको, मध्य अमेरिका.
‘सिंगापूर डेझी’ या सामान्य नावाने ओळखली जाणारी ही एक जमिनीलगत पसरणारी वेलीसारखी प्रजात आहे. ही प्रजात दाट पसरते आणि त्याला छोटी सूर्यफुलासारखी फुले येतात. तसे हे तण आहे. मात्र, आपल्याकडे बागेच्या कडा आणि बाह्यकुंपण सजवण्यासाठी हमखास वेडेलिया लावतात.
टाबेबुईया
मूळ ठिकाण - मध्य व दक्षिण अमेरिका
‘टाबेबुईया’ची फॅशन साधारण 15 वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाने आणली. या प्रजातीची पिवळी, गुलाबी, जांभळी आणि निमसफेद रंगातील फुले हिवाळ्याच्या शेवटी फुलायला लागतात. संपूर्ण झाड फुलांनी डवरते आणि नंतर फुले झडून जातात. ही प्रजात साधारण 40 ते 50 फूट उंच वाढते.
दुरंगी बाभूळ
मूळ ठिकाण - मध्य व दक्षिण अफ्रिका
‘बेल मिमोसा’ नावाने प्रसिद्ध असलेले हे फुलझाड आपल्याला शमीच्या नावाखाली खपवले जाते. याला सुंदर अशा दोन रंगाच्या फुलांचा तुरा असतो. पुढे पिवळा आणि मागे गुलाबी रंग असतो. याला बागेत शोभेचे झाड म्हणून लावत असले, तरी काहीजण शमी समजून हे विदेशी झुडूप घेतात. भारतीय जैवव्यवस्थेत हा आगंतूक आहे. शमीचा फूलतुरा पूर्ण फिकट पिवळ्या रंगाचा असतो.
मूळ ठिकाण - मध्य दक्षिण आफ्रिका
‘आफ्रिकन ट्युलिप’ किंवा ‘पिचकारी’ ही वनीकरण विभागाने गुलमोहोरासोबत भारतात आणलेली एक फुलझाडाची जात. याची फुले डवरली की दिसायला चांगली दिसतात. यांच्या फुलांमधील मध प्यायल्यावर मधमाशा मरतात, असे निरीक्षण अभ्यासकांनी मांडलेले आहे. याची उंची 30 फुटांची असते. मात्र, वनीकरणात टाळला जावा, असा वृक्ष आहे.
स्नेकवीड
मूळ ठिकाण - जमैका/कॅरीबियन/फ्लोरिडा
तणवर्गीय असणार्या या प्रजातीला एक तुरा येतो. या तुर्यावर आकर्षक अशी निळी फुले एकेक करून फुलतात. याचा ताटवा दिसायला सुंदर दिसतो. याची फार वाढ होत नसली, तरी ते तण आहे. मात्र, भारतात बर्याच फुलपाखरांनी याचा मध आणि पाने आपलीशी केलेली आहेत. फुलपाखरे आणि मधमाशांसाठी हे झाड बागेत लावता येईल.
शोभेचे बह्मकमळ
मूळ ठिकाण - मेक्सिको व निकारागुआ
हे निवडुंगाच्या कुळातील शोभिवंत फुलझाड आहे. जून ते सप्टेंबरमध्ये याला सुंदर ओंजळीएवढ्या आकाराची फुले येतात. मंद वास असतो. एका वेळी असंख्य फुले फुलतात. रात्री 12 वाजेनंतर फुले मलूल पडायला चालू होतात. भारतात या फुलझाडाविषयी बरेच आकर्षण आहे. ‘खोटे ब्रह्मकमळ’ म्हणून प्रसिद्ध असलेले हे झाड विदेशी आहे, हे बर्याचजणांना नव्याने माहीत झाले असेल.
विदेशी भोकर
मूळ ठिकाण - वेस्ट इंडीज व दक्षिण अमेरिका
‘स्कार्लेट बेल’ किंवा ‘विदेशी भोकर’ला केशरी रंगाची आबोलीसारखी गुच्छात फुले येतात. 25 ते 30 फूट उंचीचा हा मध्यम वृक्ष शहरी वनीकरणासाठी वापरला गेला. आपल्याकडील देशी भोकराच्या कुळातील हा वृक्ष असून याची फुले दिसायला सुंदर असतात. बर्यापैकी पाने असल्याने सावलीदेखील देतात. मात्र, मध आणि इतर दृष्टीने देशी प्रजातीशी वेगाने स्पर्धा करणारा वृक्ष आहे.
कृष्णकमळ
मूळ ठिकाण - ऑस्ट्रेलिया,अमेरिका
‘पॅशनफ्रुट’ नावाने परिचित या फुलझाडाचे विविध प्रकार भारतात स्थित झाले आहेत. सफेद, निळे, जांभळे, किरमिजी रंगातील फुले सुंदर आणि टपोरी दिसतात. याची वेल असते. यातील दोन प्रजाती या निव्वळ तण असून त्या बेफाम वाढतात. यांच्या फुलांमध्ये किंचित विषारीपणा असतो. मात्र, यातील जांभळ्या प्रजातीचे फळ सरबतात वापरतात. शोभिवंत वेल म्हणून कुंपणावर लावण्यासाठी याचा वापर होतो. फुलपाखरे आणि मधमाशा यावर आकर्षित होतात.
आंतरराष्ट्रीय पुष्प दिनानिमित्त विदेशी फुलझाडांची वाईट बाजू पाहण्याऐवजी ज्यांनी आपल्याला आनंद दिला, बागेला सुशोभित केले, येथील जीवसृष्टीला आसरा आणि व्यापारी जातींनी देशाला ‘अर्थ’ दिला अशा विदेशी फुलझाडांच्या प्रजातींकडे पाहूया. त्यांना जपूया. चांगली विदेशी फुलझाडे अभ्यासपूर्वक लावूया, हाच या पुष्प दिनाचा आणि नवीन वर्षाचा संकल्प!