"भारतातील मुलगा जेव्हा...",पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलजीत दोसांझचे केले कौतुक

    02-Jan-2025
Total Views |

modi  
 
 
मुंबई : पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याने नववर्षाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधानांनी देश आणि संगीत क्षेत्राबद्दल दिलजीतसोबत गप्पा मारल्या. दरम्यान, दिलजीतने पंतप्रधानांच्या या भेटीचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. तसेच, या भेटीत त्याने त्याचा अनुभव आणि पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेबद्दलही लोकांना माहिती दिली आहे.
 
दिलजीतने पंतप्रधान मोदींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करत लिहिले आहे की, 'अतिशय संस्मरणीय संवाद! माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत.' तर दिलजीतसोबत गप्पा मारताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारतातील मुलगा जेव्हा जगात आपल्या देशाचे नाव प्रसिद्ध करतो, तेव्हा खूप छान वाटते. तुझ्या घरच्यांनी तुझं नाव दिलजीत ठेवलं, त्यामुळे तू लोकांची मनं जिंकत आहे." दिलजीत आणि पंतप्रधानांमधील पुढील संवादात दिलजीत म्हणाला की, "आम्ही वाचायचो की माझा भारत महान आहे आणि लोकं देखील म्हणतात, हे मला भारतभर फिरल्यानंतर कळले”.
 
 
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दिलजीत सोबतचे फोटो शेअर करत लिहिले आहे की, 'दिलजीत दोसांझसोबतचा छान संवाद. तो खरोखर अष्टपैलू आहे, त्याच्याकडे प्रतिभा आहे की तो आपल्या संस्कृतीला एकत्र आणू शकतो. आम्ही संगीत, संस्कृती अशा अनेक विषयांवर संभाषण केले आणि आमचे विचार जोडले गेले”. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दिलजीतने भारतातील दिल-लुमिनाटी टूरची सांगता केली. त्यानं भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये म्युझिक कॉन्सर्ट करून अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक समस्यांवर भाष्य देखील केले.