भोपाळ दुर्घटनेतील विषारी कचऱ्याचे ४ दशकांनी स्थलांतर!
पिथामपुर येथे लावली जाणार कचऱ्याची विल्हेवाट
02-Jan-2025
Total Views |
भोपाळ: भारतच नव्हे, तर संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या भोपाळच्या विषारी वायू गळतीला ४० वर्ष लोटली. या वायु गळतीमुळे २५ हजारांहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते, तर दुसऱ्या बाजूला हजारो लोकांच्या जीवनावर या वायुगळतीमुळे विपरीत परिणाम होऊन, त्यांना शारिरीक अपंगत्वाला सामोरं जावे लागले. यानंतर आता ३७७ टन विषारी कचरा भोपाळ येथील युनियन कारबाईडच्या कारखान्यातून पिथमपूर येथे हलवला जणार आहे, जिथे टप्प्यांमध्ये या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.
१ जानेवारीच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास १२ सीलबंद ट्रक्समधून हा कचरा, मध्यप्रदेशच्या ग्रीन कॉरिडॉरमधून नेण्यात आला आहे. कडक बंदोबस्तात या गाड्या पहाटे ४:३०च्या सुमारास पिथमपूर येथे पोहोचल्या. सात तासांचा हा लांब प्रवास पूर्ण करण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती भोपाळ गॅस दुर्घटना मदत आणि पुनर्वसन विभागाचे संचालक स्वतंत्र कुमार सिंह यांनी दिली. या विषारी कचऱ्यामध्ये माती, कीटकनाशकांचे अवशेष असून, यात उत्पादन प्रक्रियेतील रसायनांसह पाच प्रकारच्या घातक पदार्थांचा समावेश आहे. या कचऱ्याच्या स्थलांतरासाठी ३० मिनिटांच्या शिफ्टमध्ये एकूण १०० कर्मचारी काम करत होते. सदर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी नियमितपणे केली जात असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. संबंधित अधिकाऱ्यांकडून कचऱ्याची अद्याप विल्हेवाट न लावल्यामुळे मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयाने त्यांना धारेवर धरले. अखेर उच्च न्यायलयाने कचऱ्याच्या स्थलांतरासाठी ४ आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे, कोर्टाच्या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे न्यायालयाने बजावले आहे. २०१५ साली यशस्वी झालेल्या या प्रयोगाच्या आधारावरत विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले आहे.