महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर व अमरावतीचे पालकमंत्री
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार
19-Jan-2025
Total Views |
नागपूर : महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांची नागपूर व अमरावती या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने १८ जानेवारी रोजी सायंकाळी शासन निर्णय जारी केला. नागपूर व अमरावतीचे पालकमंत्रीपद देण्यात आल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे गडचिरोली जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
१ जानेवारी २०२५ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली मधील विकास कामांचे भूमिपूजन केल्यानंतर आपण गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या याच दौऱ्यात कुख्यात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्यप्रवाहात सहभागी होण्याचे वचन दिले त्यानंतर या भागातील नक्षलवादी चळवळ पूर्णपणे संपून टाकू व जनतेलाही मोकळा श्वास, रोजगार देण्याचा प्रण फडणवीस यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून स्वीकार केला.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर व अमरावती या मोठ्या जिल्ह्यांसाठी पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. बावनकुळे यांनी मागच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये तीन जिल्ह्यांची जबाबदारी पार पाडली होती. बावनकुळे यांची प्रशासन सांभाळण्याची हातोटी विलक्षण आहे. त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेतील सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तीन वेळा ते विधानसभेचे आमदार आहेत. मधली दोन वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते.
भारतीय जनता पक्षाच्या पक्षीय विस्तारात श्री बावनकुळे यांनी प्रदेशअध्यक्ष म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. ऊर्जा मंत्री म्हणून २०१४ ते २०१९ या काळात काम करत असताना, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेळघाटातील दुर्गम भागात वीज पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम केले आहे.
मुख्यमंत्र्यांना धन्यवाद
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले. ते म्हणाले, "आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर व अमरावती या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मला दिली आहे. २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्रजींच्या नेतृत्वात मी नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले. मागील अडीच वर्षात स्वतः देवेंद्रजी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी आपल्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात नवे मानदंड प्रस्थापित केले. आज पुन्हा एकदा नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री होताना आनंद व जबाबदारीची जाणीव आहे. जनतेचे मला कायमच प्रेम लाभले आहे. अमरावती जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील असेन. विदर्भाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या नागपूर व अमरावती या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानतो."
रोजगार, पायाभूत सुविधा आणि कृषि प्रक्रिया उद्योगांना चालना देऊ : बावनकुळे
पालकमंत्री पदाची घोषणा झाल्यावर श्री बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यात रोजगार आणि उद्योग तसेच पायाभूत सुविधा निर्माण करू, असे म्हटले आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आपण जनता दरबार भरूवू. सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांना कोणती समस्या भेडसावत आहे याचा अभ्यास करून उद्योगाला चालना देऊ असे त्यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या कृषी कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करून शेतकरी व तरुणांना ताकद देऊ, तसेच महसूल व्यवस्था मजबूत करण्यासाठी तालुकानिहाय भेटी देवू असे त्यांनी सांगितले.