दशम गुरू गोविंदसिंह यांचे ‘रामावतार’

    19-Jan-2025
Total Views | 41
Guru Govind Singh

शिखांचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंदसिंह, हे थोर योद्धे, दार्शनिक चिंतक लेखक आणि संगीत मर्मज्ञ कवी होते. महाराष्ट्रातील नांदेड येथे त्यांचे बलिदान स्मारक, गुरूद्वारा आहे. त्यांच्या नावावर अनेक काव्यग्रंथ आहेत. प्रभु रामचंद्राविषयी त्यांच्या मनी विशेष श्रद्धाभाव होता. त्यांचा ‘२४ अवतार’ नावाचा ग्रंथ सर्वपरिचित आहे. त्यापैकीच एक वैशिष्ट्यपूर्ण काव्यग्रंथ म्हणजे ‘रामावतार’ होय. गोविंदसिंह यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी इ. स. १६९८ साली त्यांनी, सतलज नदी किनारी नैना देवी परिसरात ‘रामावतार’ लिहून, श्रीराम अवतार कार्याचे भक्तीभावाने गुणसंकीर्तन केलेले आहे. त्यात २६ प्रकरणे आहेत. हे काव्य वीररसाचे उत्कट राम दर्शन आहे.

राम परम पवित्र हैं, रघुवंश के अवतार ।
दुष्ट दैतन के संघारक, संत प्रान अधार ॥

पंंजाबची ‘सुजलाम सुफलाम’ धरती भारतीय सनातन संस्कृतीची जन्मभूमी आहे. चीनाब (चंद्रभागा), झेलम (वितस्ता), रावी (इरावती), ब्यास (बिपाशा), सतलज (शतद्रु) या पंचनद्या आणि सिंधु-सरस्वती नद्यांचा परिसर, हा वेद वाङ्मयाची जननी आहे. एवढेच नव्हे, तर पंजाबी समाजाची-काही अभ्यासकांची अशी श्रद्धा-समजूत आहे की, रामायण महाकाव्याचा जन्म अमृतसर जवळील ‘राम तीर्थ’ येथे झाला. या भागातच ऋषी वाल्मिकी यांचा आश्रम होता. त्या आश्रमातच ‘रामायण महाकाव्य’ लिहिले गेले असून, येथेच लवकुश यांनी अश्वमेध यज्ञाचा घोडा अडवून, सर्व नामवंत योद्ध्यांचा पराभव केला होता. आदि कवी वाल्मिकी ऋषी यांनी लिहिलेल्या मूळ काव्याचे नाव ‘पौलस्य वध’ असे होते. पुढे ते ‘रामायण’ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झाले. अशा प्रकारे पंजाब ही आदिकाव्य रामायणाची ही जन्मभूमी आहे, असे पंजाबी लोक मानतात. त्यामुळे राम आणि रामकथा गुणवर्णनाची परंपरा, शीख परंपरेत फार पूर्वीपासून आहे. सोढी लिखित ‘आदि रामायण’, भल्ला लिखित ‘हनुमाननाटक’ या रचना, ‘रामावतार’ पूर्व काळात प्रसिद्ध होत्या.

शिखांचे दहावे गुरू म्हणून श्री गुरू गोविंदसिंह यांचे योगदान अपूर्व व ऐतिहासिक आहे. इ. स. १४६९ मध्ये बाबा नानक देव यांनी, स्वतंत्र अशा शीख धर्माची स्थापना केली असे मानले जाते. ‘एक ईश्वर’, ‘स्त्री-पुरुष समानता’ आणि ‘मानव प्रेम सद्भाव’ या तत्त्वावर आधारित या धर्माचे, बाबा नानकदेव यांच्यानंतर वेगवेगळ्या गुरूंनी नेतृत्व केले. त्यापैकी श्री गुरू गोविंदसिंह हे दहावे आणि शेवटचे मानवरूप गुरू होय. त्यानंतर ‘ग्रंथ साहिब’ ग्रंथालाच, कायमचे गुरू पदी विराजमान करण्यात आले आणि ‘गुरू ग्रंथ साहिब’ हा शीखांचा सर्वोच्च परमादरणीय धर्म ग्रंथ, ‘गुरू’ म्हणून विख्यात झाला. हे कार्य शेवटचे मानव गुरू गोविंदसिंहानी केले. दशम गुरू गोविंदसिंह यांचा जन्म, दि. २२ डिसेंबर १६६६ साली पटना (बिहार) येथे झाला आणि महाराष्ट्रातील नांदेड येथे दि. ७ ऑक्टोबर १७०८ रोजी त्यांचे बलिदान झाले. उण्यापुर्‍या ४२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी केलेले कार्य ऐतिहासिक आहे.
गुरू गोविंदसिंह हे शूरवीर योद्धा होते. मुघलांच्या धर्मांध अत्याचारांपुढे मान न झुकवता, त्यांच्या छोट्या छोट्या चार पुत्रांनी-शहजाद्यांनी बलिदान दिले. हे संस्कार त्यांना वडिलांकडून लाभलेले होते. गुरू गोविंदसिंह थोर चिंतक, दार्शनिक कवी होते. संगीत मर्मज्ञ-रसिक होते. त्यांच्या नावावर फार मोठी ग्रंथ संपदा आहे. ‘जपु साहिब’, ‘विचित्र नाटक’, ‘चंडी दी वार’, ‘शब्द हजारे’, ‘२४ अवतार’, ‘जफरनामा’, ‘खालसा महिमा’,‘गिआन प्रबोध’(ज्ञान प्रबोध) या त्यांच्या प्रमुख ग्रंथरचना प्रसिद्ध आहेत. ‘रामावतार’ ही त्यांची आवडती व सर्वश्रेष्ठ अशी वीररस संपन्न ग्रंथरचना आहे. गुरू गोविंदसिंहांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्यांच्या काव्यरचना या पंजाबी, बृजभाषा, पारसी भाषांमध्ये असून, पंजाबी ‘गुरूमुखी’ लिपित लिहिलेल्या आहेत. गुरू गोविंदसिंह गुणांचे-प्रतिभेचे प्रशंसक होते. त्यांच्या विद्या दरबारामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रातील ५२ विद्वान कवी, साहित्यिक, चिंतक होते.

‘रामावतार‘ काव्यांची वैशिष्ट्ये

दशम गुरू गोविंदसिंह यांनी भगवान विष्णुंच्या २४ अवतारांचे गुणवर्णन करणारे काव्य लिहिले असून, ते ‘२४ अवतार’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामध्ये इतर अवतारांसमवेत, विष्णुचा सातवा अवतार म्हणून प्रभू श्रीरामाचे गुणकीर्तन आहे. त्याशिवाय त्यांनी केवळ राम अवताराची थोरवी गाणारे ‘रामावतार’ हे स्वतंत्र काव्यही लिहिलेले आहे. श्रीराम हा त्यांचा सर्वाधिक आवडता अवतारी महापुरुष होता. ‘रघुवंश के अवतार’, ‘दैत्य संहारक’, ‘संतांचा प्राण-आधार’ अशा अनेक विशेषणाांनी, गुरू गोविंदसिंहाने श्रीरामाच्या दिव्य रूपाचे वर्णन केलेले आहे. या लेखाच्या प्रारंभीच्या दोन काव्यपंक्ती गुरू गोविंदसिंहांच्या ‘रामावतार’मधील असून, त्या ओळी म्हणजे भगवद्गीतेतील ‘परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम् ।’ या श्लोकाचा सुंदर भावार्थच आहे. यावरून बहुश्रुत विद्वान असलेल्या गुरू गोविंदसिंह यांनी गीता, भागवत, उपनिषदे या सनातन वैदिक वाङ्मयाचाही अभ्यास केला होता हे स्पष्ट होते.

‘रामावतार’ हा शीख धर्मगुरूंच्या अधिकृत रचनांपैकी एक प्रमुख काव्यरचना म्हणून ख्यात आहे. इ. स. १६९८ मध्ये ‘रामावतार’ ग्रंथाची रचना पूर्ण झाली, अशी त्या ग्रंथाच्या समारोपात नोंद आहे. हा ग्रंथ गुरू गोविंदसिंहांनी पंजाबमधील ‘सतलज’ म्हणजेच प्राचीन ‘शतद्रु’ नदीकाठी असलेल्या, नैना देवीच्या पावन क्षेत्री लिहिलेला आहे. त्यावेळी गुरू गोविंदसिंह यांचे वय ३२ वर्षांचे होते. त्यांना अनेकवेळा ईश्वरी साक्षात्कार झालेले होते. ‘रामावतार’ ही एक विशाल काव्यरचना आहे. ती बृज भाषेत गुरुमुखी लिपित लिहिलेली आहे. या काव्यग्रंथात २६ प्रकरणे (अध्याय) असून, ८६४ छंद आहेत.

श्री रघुनंदन की भुज ते जब घोर सरासन बान उडाने,
भूमि अकास चहुँ चक पूर रहे नहि जात पछाने ।
तोर सनाह सुनादन कतन आहे करी नही पार पराने ,
छेद करोरन और न कोट अटान मो जानकी बाण पछावे ॥

गुरू गोविंदसिंह आपल्या वीररसयुक्त ‘रामावतार’ कथेचा प्रारंभ, वाल्मिकी रामायणातील ‘श्रावणबाळ’ कथेने करतात आणि ‘सीता भूमी प्रवेश’ प्रसंगाने, रामावताराची समाप्ती होती.

सिय पेख ‘राम’ विंधी बाण काम ।
रहे ठाढे ऐसे रण वीर जैसे ॥

एक महान योद्धा, मर्यादापुरुषोत्तम म्हणून श्रीरामाचे गुरुजींनी (गोविंदसिंहांनी) ‘रामावतार’ मध्ये केलेले गुणवर्णन, धर्म, नीती, पराक्रमाचे शाश्वत प्रेरणास्थान आहे.

॥ जय श्रीराम ॥
९८८१९०९७७५
(पुढील लेखात : वंग भूमीतील (बंगाल) दोन रामायणे)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121