आता न थांबता करा इलेक्ट्रिक बसने ५०० किलोमीटर्सचा प्रवास

मुंबईतून पुणे, नाशिकच नाही तर रत्नागिरी, धुळ्यापर्यंत करा इलेक्ट्रिक बसने नॉनस्टॉप प्रवास

    19-Jan-2025
Total Views |

electric bus
 
नवी दिल्ली (Electric Bus) : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्स्पोमध्ये नव्या मोटारी आणि व्यवसायिक वाहनांचे नवे मॉर्डल पहायला मिळत आहेत. ऑलेक्ट्रा ग्रिनटेक लिमीटेड (OGL) नं आपली नव्या पिढीच्या इलेक्ट्रिक बस या मेळ्यात लाँच केल्या आहेत. एकदा चार्ज केल्यावर ही बस थोडेथोडके नव्हे चक्क ५०० किलोमीटर्स धावणार आहे. म्हणजेच मुंबईतून फक्त नाशिक, पुणे नाही तर थेट छत्रपती संभाजी नगर , नगर , कोकणात थेट सांवतवाडी पर्यंत ही बस एका चार्जमध्ये प्रवास करू शकते.
 
ओलेक्ट्राने येथे नव्याने डिझाइन केलेले १२-मीटर ब्लेड बॅटरी प्लॅटफॉर्म आणि नवीन शैलीतील ९-मीटर सिटी आणि ब्लेड बॅटरी ने सुसज्ज १२-मीटर कोच बसेस अशी त्यांची नवी उत्पादने सादर केली आहेत. महाराष्ट्रासाठी याचे महत्व अशासाठी की ऑलेक्ट्राला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे. इ शिवाई आणि शिवनेरी बरोबरच ९ मीटरच्या छोट्या बसेसचा टप्प्या टप्यातला पुरवठा महामंडळाला दर महिन्यात ऑलेक्ट्रा कडून केला जातोय.
 
ब्लेड बॅटरी तंत्रज्ञान
 
ब्लेड बॅटरी मध्ये ३० % अधिक ऊर्जा साठवणूक क्षमता आहे, ज्यामुळे या बसेस एका चार्जवर ५०० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतात. ती अधिक जागा वाचवते आणि तुलनेने हलकी आहे. ५००० पेक्षा जास्त चार्ज सायकलचे आयुष्य असणारी ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांसाठी आगामी काळात जास्त टिकाऊ आणि विश्वासार्ह पर्याय ठरू शकते. कंपनीने दावा केल्या प्रमाणे आंतराष्ट्रीय मानकांच्या अत्यंत कठोर चाचण्या कोणत्याही आग स्फोटसारखे अपघात न होता या बॅटरीजने पार केलेल्या आहेत.
 
अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स (ADAS), GPS ट्रॅकिंग आणि CCTV कॅमेरे यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे उत्तम सुरक्षा उपाययोजना यात आहेत. एअर सस्पेंशन, व्हीलचेअर रॅम्प सारख्या सुविधा यामूळे या बसेस दिव्यांगस्नेही आहेत.
 
पारंपारिक डिझेल बसेसना इलेक्ट्रिक बसेसचा पर्याय दिल्यास जिवाश्म इंधनावरचा (डिझेल) भारताचा खर्च वाचतो. भारताची इंधनाची आयात कमी झाल्याने परकिय चलन वाचू शकते. बरोबरीनेच ऑपरेशनल खर्च कमी आणि शहरातील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली जाउ शकते. कंपनीने इलेक्ट्रिक टिपर्स च्या क्षेत्रातही आपले पाय रोवल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.