पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम

    17-Jan-2025
Total Views | 42
Kirti college

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ( Punyashloka Ahilyabai Holkar ) यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्ष निमित्ताने ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या मुंबई येथील कीर्ती एम. डुंगुरसी महाविद्यालय (स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन शुक्रवार, दि. १० जानेवारी व शनिवार, दि. ११ जानेवारी रोजी करण्यात आले होते.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवार, दि. १४ जानेवारी रोजी दादर येथील शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कीर्ती महाविद्यालय, ‘नवीनचंद्र मेहता इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड डेव्हलोपमेंट’ आणि जयश्री शरदचंद्र कोठारी बिझनेस स्कूल या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुंबई येथील संस्थांमधील प्रा. वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अहिल्याबाईंच्या जीवनावर आधारित ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ हा दीर्घांक सादर करण्यात आला. या दीर्घांकाचे लेखन कीर्ती महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील मराठीच्या अध्यापिका माधुरी जोग यांनी केले होते. दिग्दर्शनाची धुराही माधुरी जोग यांनी तसेच अभिनेता आणि कीर्तीचे माजी विद्यार्थी किरण पाटील यांनी सांभाळली. यात २६ कलाकारांचा सादरीकरणात सहभाग होता. सहभागी झालेल्या सर्वांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त नील हेळेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या दीर्घांकासाठी प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक देवेंद्र पेम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. दीर्घांकाची प्रकाशयोजना सुप्रसिद्ध प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे यांनी केली होती. या सादरीकरणानंतर स्पर्धांचा बक्षीस समारंभ पार पडला. यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. देविदास पोटे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त नील हेलेकर, डॉ. विष्णू वझे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. मिलिंद जोग आणि स्पर्धांच्या संयोजिका मेजर डॉ. उर्मिला सरकार उपस्थित होते. डॉ. महरुद्र केकरे, उषा मराठे, सुषमा घुमरे, मनीषा मराठे, धीरज बोरीकर आदी मान्यवर यावेळी सभागृहात उपस्थित होते. रितेश रेवाळे, हर्ष शिगवण, ध्रुव देसाई, मानसी गुरव आणि त्यांच्या चमूने स्पर्धांचे व कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. मीनल मापुस्कर, ‘एनएमआयटीडी’च्या प्रभारी संचालक आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्या डॉ. रसिका मल्या, कीर्ती महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. अपूर्वा यादव या सर्वांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121