मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Rashtriya Charchasatra Shekhar Yadav) उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे मोठ्या उत्साहात 'महाकुंभ' होत आहे. देश-विदेशातून भाविक मोठ्यासंख्येने याठिकाणी आले आहेत. तथापी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त (तारखेप्रमाणे) महाकुंभ मेळा परिसरातील सेक्टर ६ मध्ये असलेल्या नेत्र कुंभ शिबिरात 'राम मंदिर आंदोलन आणि गोरक्षपीठ' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. दि. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव हे प्रमुख वक्ते असतील. या कार्यक्रमात राम मंदिर आंदोलनाशी संबंधित संघर्ष आणि त्या संघर्षात आपली भूमिका बजावणाऱ्या रामभक्तांची माहिती दिली जाणार आहे.
हे वाचलंत का? : फक्त सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नाही तर समाज प्रेरक बना : हेमंत मुक्तिबोध
या चर्चासत्रात विश्व हिंदू परिषदेचे संरक्षक बडे दिनेश जी, अशोक बेरी आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव हे प्रमुख वक्ते आहेत. कार्यक्रमाचे संयोजक शशी प्रकाश सिंह यांनी सांगितले की, अयोध्येतील प्रभू रामलला यांच्या अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नेत्र कुंभ शिबिरात मुख्य वक्ते म्हणून येणारे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव यांनी काही दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमात एका विशिष्ट धर्मावर भाष्य केल्याने ते वादात सापडले होते. मुस्लिम समाजाला संबोधित करताना त्यांनी 'काठमुल्ला' असा शब्दप्रयोग केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.