मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री त्याच्या वांद्रे पश्चिम, मुंबईतील निवासस्थानी चाकूने हल्ला झाला. ही घटना रात्री अडीच वाजता घडली. एका अज्ञात व्यक्तीने घरात शिरून त्याच्यावर चाकू हल्ला केला. हल्ल्यानंतर ‘सैफ अली खान’ यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, सैफ यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र त्यांना काही दिवस रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवावे लागेल.
हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांचा तपास सुरू असून, हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. प्रथम निदर्शनी असे दिसून आले आहे की, हल्लेखोराने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला असावा. मात्र सैफशी झालेल्या झटापटीत त्याने हल्ला केला. या घटनेमुळे १९९८ मधील 'हम साथ साथ हैं' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणाची आठवण होते, ज्यात सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांच्यावर आरोप झाले होते.
हे वाचलंत का? - सैफ अली खानवर घरात हल्ला! लीलावती रुग्णालयात उपचार सुरू
‘बिष्णोई’ समाजाने या प्रकरणात मोठी भूमिका बजावली होती, कारण काळवीट हा त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा भाग आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याचा आणि बिष्णोई समाजाच्या संतप्त प्रतिक्रियांचा काही संबंध आहे का ? हे तपासण्याची गरज आहे. पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
सैफ अली खान यांच्या कुटुंबातील सदस्य, पत्नी करीना कपूर खान, मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खान रुग्णालयात उपस्थित आहेत.
‘सिद्धार्थ आनंद’ आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकारी ‘दया नायक’ यांनाही रुग्णालयात पाहिले गेले. सैफ अली खान यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या चाहत्यांना संयम बाळगण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. रुग्णालय प्रशासनानेही सैफ यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक हल्लेखोराचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. पोलिसांनी सैफ अली खान यांच्या घरातील सुरक्षा व्यवस्थेचीही चौकशी सुरू केली आहे.