नवी मुंबई,दि.१६ : प्रतिनिधीविशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस एजन्सीतर्फे सिडकोच्या सेवेत ठेका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचारांचे किमान वेतन व इतर मागण्यांसाठी आज, गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची लाखो रुपयांची भविष्यनिर्वाह निधी रक्कम बुडविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सिडको प्रशासनाकडून केला जात आहे. सिडको कार्मिक विभागाच्या प्रधान व्यवस्थापक प्रमदा बिडवे यांनी जारी केलेले परिपत्रक दैनिक मुंबई तरुण भारतच्या हाती लागले आहे.
सिडकोच्या निरनिराळ्या विभागातील लिपिक/टंकलेखक, वाहक, शिपाई तसेच अग्निशामन दल विभागात ३५० कर्मचारी गेले १३ ते १४ वर्षांपासून ठेकेदारी पध्दतीने काम करीत आहेत. यातील बहुतांश कर्मचारी नवी मुंबई प्रकल्पग्रस्त आहेत. या कर्मचाऱ्यांना विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस एजन्सी या ठेकेदाराकडून सिडकोच्या कार्मिक विभागाच्या अज्ञान व दुर्लक्ष यामुळे कर्मचारी कायद्याप्रमाणे वेतन, भत्ते व इतर सवलती देण्यात येत नाहीत. गेले १७ ते १८ महिने या कर्मचा-यांच्या वेतनातुन कपात केलेली लाखो रूपयांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम या ठेकेदाराने भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा केली नसून या रक्कमेचा अपहार केला आहे. तसेच दोन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे वेतनही थांबवले आहे. या अन्यायाविरूद्ध दाद मागण्यासाठी हे सर्व कर्मचारी मुंबई लेबर युनियनच्या नेतृत्वाखाली गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत धरणे आंदोलन करणार आहे.
मागील २०११ ते २०१२ पासून आजपर्यंत सिडको महामंडळात आम्ही काम करीत आहोत. विशाल एक्सपर्ट सर्व्हिस प्रा.लि. एजन्सी मार्फत सिडको महामंडळात जवळ पास ३५० कर्मचारी काम करीत आहेत. तर काही कर्मचारी यांचे कुटुंब या वेतनातूनच चालते. एक ते दीड वर्षापासून भविष्य निर्वाह निधी जमा केले नसून. त्यावर मिळणारे व्याजाचे देखील नुकसान झाले आहे. सर्व कामगारांना एजन्सीमार्फत देण्यात येणारे वेतन व भविष्य निर्वाह निधी मिळवून देत न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सिडकोला केली आहे.