लाडक्या बहिणींना २६ तारखेपर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार!
मंत्री आदिती तटकरेंची घोषणा
16-Jan-2025
Total Views |
मुंबई : येत्या २६ तारखेपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवार, १६ जानेवारी रोजी दिली.
माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आपण २५ ते ३० डिसेंबर दरम्यान वितरित केला होता. जानेवारी महिन्याच्या लाभ वितरणास साधारणपणे २६ जानेवारीच्या आत सुरुवात होईल. यासंदर्भातील आर्थिक नियोजन अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याचा लाभ तीन ते चार दिवसांच्या कालावधीत लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होईल. जानेवारी महिन्याच्या लाभासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. पण दर महिन्याला तो महिना संपायच्या आत आपण लाभ देत असतो. या महिन्यातसुद्धा २६ जानेवारीच्या आत लाभ वितरणाची सुरुवात होईल. नवीन अर्थसंकल्पाच्या पुढच्या कालावधीमध्ये २१०० रूपये देण्याबाबतचा सकारात्मक विचार करण्यात येईल. त्यामुळे या महिन्यात १५०० रुपयांचा लाभ खात्यात वितरित करण्यात येणार आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न!
"विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली आहे. त्यांनी वेगवेगळे आरोपही केलेत. विरोधकांनी त्यांच्या जाहीरनाम्यात ३ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. ज्यावेळी एखादी युती किंवा आघाडी जाहीरनामा तयार करते त्यावेळी त्यातील घोषणांच्या अधिन राहूनच सरकार काम करत असते. आमची महायुतीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. जास्तीत जास्त महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे," असेही त्यांनी सांगितले.
"या योजनेसाठी अर्थ विभागाकडून ३ हजार ६९० कोटींची तरतूद प्राप्त झाली आहे. त्यातून या महिन्याचा लाभ वितरित होणार आहे. तसेच फेब्रुवारी महिन्याची तयारीसुद्धा आम्ही करत आहोत. आम्ही २ कोटी ४६ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला. काही महिलांबाबत तक्रार आली होती. ड्युप्लिक्शन झालेल्या केसेस कमी असल्याने लाभार्थ्यांच्या संख्येत फार काही फरक पडेल असे मला वाटत नाही. या महिन्यातील आकडा आधीसारखाच राहील," असेही त्यांनी सांगितले.