केजरीवाल यांच्यावरच ‘आप’दा!

    15-Jan-2025
Total Views |

Arvind Kejriwal
 
दिल्ली विधानसभेत कोणता पक्ष विजयी होईल, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. या तीन पायांच्या शर्यतीत सध्या जरी, आम आदमी पक्ष पुढे दिसत असला, तरी आम आदमी पक्षासाठी ही निवडणूक जिंकणे ही अशक्यप्राय गोष्ट ठरणार आहे. ‘आप’ची जागा भाजप घेईल की काँग्रेस, इतकाच आता प्रश्न आहे.
 
दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये तीव्र चुरस निर्माण झाली असून, हे पक्ष विलक्षण अहमहमिकेने एकमेकांविरोधात आरोप करीत आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार सलग तीनदा सत्तेवर आले असल्याने, यावेळी जनमत त्या सरकारविरोधात गेले आहे. केजरीवाल जरी लोकप्रिय असले, तरी त्यांना पूर्वीइतका पाठिंबा मिळताना दिसत नाही. जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च करून, त्यांनी उभारलेला शीशमहाल आणि मद्यविक्री धोरणातील प्रचंड घोटाळा या पक्षाच्या अंगाशी येणार हे उघड दिसत आहे.
 
दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या आधीपासूनच, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराला प्रारंभ करून त्यात आघाडी घेतली होती. त्यांनी आपल्या पक्षाचे अनेक उमेदवारही जाहीर केले होते. पण, लवकरच ही आघाडी मागे पडली. मनीष सिसोदिया यांचा ठरलेला मतदारसंघ त्यांना सोडावा लागला आणि दुसरीकडून त्यांना उमेदवारी दिली गेली. दिल्लीच्या काळजीवाहू आणि कठपुतळी मुख्यमंत्री असलेल्या आतिशी मार्लिना यांनी, आपले नाव बदलल्याने त्यावरूनही भाजपने त्यांच्यावर टीका केली. त्यांच्याविरोधात त्यांनी वादग्रस्त खासदार रमेश बिधुरी यांना उमेदवारी दिल्यानेही मोठा वाद झाला. त्यातच बिधुरी यांनी आतिशी यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याने, नवा वाद उत्पन्न झाला. तरीही आतिशी यांची जागा सुरक्षित मानली जात नाही. त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
 
तीच गोष्ट केजरीवाल यांची. त्यांच्या विरोधात भाजपने परवेश वर्मा यांना उभे केले आहे. ते जाट असून, दिल्लीचे भाजपचे दिवंगत मुख्यमंत्री साहेबसिंह वर्मा यांचे पुत्र आहेत. भाजप जाटविरोधी पक्ष आहे, हा केजरीवाल यांचा प्रचार खोटा ठरविण्यासाठी केजरीवाल यांच्यासमोर, वर्मा यांना उभे करण्यात आले आहे. वर्मा यांनी केजरीवाल यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडल्याने, केजरीवाल यांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागत आहे. वर्मा यांनी यापूर्वी, भाजपने न जिंकलेल्या जागी विजय मिळवून दाखविला आहे. त्यामुळे त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही.
 
भाजपच्या प्रचाराला जरी धीम्या गतीने सुरुवात झाली असली, तरी आता भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी आम आदमी पक्षाविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या प्रचाराला प्रारंभ केला आणि दिल्लीतील राजकीय वातावरण एकदम पालटले. या पक्षाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगतानाच त्यांनी, केजरीवाल यांनी केलेला भ्रष्टाचार आणि पूर्ण न केलेली आश्वासने आणि त्यासाठी दुसर्‍यांना दोष देऊन आपली कातडी बचावण्याच्या त्यांच्या धोरणावर जोरदार टीका केली. अमित शाह यांनीही काही जाहीर सभा घेऊन, वातावरण तापविले होते. भाजपने आजपर्यंत आपल्या पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, ते जाहीर केलेले नाही. मात्र, भाजपने माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना या निवडणुकीत तिकीट देण्याचे सूतोवाच केले असल्याने, त्या कदाचित मुख्यमंत्री होऊ शकतील. इतकेच नव्हे, तर भाजपच्या आता विस्मृतीत गेलेल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनाही उमेदवारी देण्यात येईल, अशी चर्चा आहे. तसे झाल्यास प्रचाराला वेगळीच कलाटणी मिळेल.
 
हे सगळे होत असतानाही काँग्रेस पक्ष थंडच होता. त्या पक्षाचे प्रमुख नेते खासदार राहुल गांधी हे गेल्या आठवड्यापर्यंत दिल्लीत कोठेच दिसत नव्हते. अचानक गेल्या रविवारी त्यांनी सीलमपूर भागातून प्रचारसभा घेतली. पण, ही निवडणूक काँग्रेससाठी फार मोठे आव्हान आहे. त्या पक्षानेही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. पण, आम आदमी पक्षावर भ्रष्टाचाराची टीका करणे, काँग्रेससाठी अवघड बनले आहे. कारण, लोकसभेसाठी तयार करण्यात आलेल्या ‘इंडी’ आघाडीत, ‘आप’ हा पक्ष त्यांना चालत होता आणि आता तो एकाएकी भ्रष्टाचारी कसा झाला, याचे काँग्रेसच्या नेत्यांकडे उत्तर नाही. केजरीवाल यांनी तर काँग्रेसची फारशी दखलही घेतलेली नाही. उलट या आघाडीतून काँग्रेसला बाहेर काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. या आघाडीतील तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा सेना, समाजवादी पक्ष वगैरे प्रमुख पक्षांनी, आम आदमी पक्षालाच पाठिंबा देण्याचे जाहीर करून काँग्रेसला एकटे पाडले आहे. त्यामुळे काँग्रेस यावेळी तरी विधानसभेत आपले खाते उघडेल का? हाच खरा प्रश्न आहे. ‘एआयएमआयएम’ आणि आम आदमी पक्षात विभागली गेल्यामुळे, काँग्रेसला दिल्लीतील मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळण्याची शक्यताही फारच कमी आहे. त्यामुळे या पक्षाची मोठी कोंडी झाली आहे.
 
केजरीवाल यांनी जनतेच्या पैशावर उभा केलेला शीशमहाल आणि मद्यविक्री धोरणातील घोटाळा, हे दोन मुद्दे आम आदमी पक्षाच्या विरोधात जाताना दिसतात. त्याशिवाय यमुनेचे पाणी आणि दिल्लीतील हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी,आम आदमी पक्षाने काहीही प्रयत्न केल्याचे दिसले नाही. दिल्लीच्या काही भागांमध्ये लोकांना प्यायला पाणीच मिळत नसून, टॅन्कर लॉबीकडून लोकांची लुबाडणूक होत असल्याचे दिसून येते. यास केजरीवाल हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. दिल्ली सरकारकडे अधिकार कमी असले, तरी जे आहेत तेसुध्दा पूर्णपणे वापरले जात नाहीत. कोणत्याही समस्येचे खापर दुसर्‍यावर फोडण्याच्या केजरीवाल यांच्या धोरणाला जनता विटली आहे.
 
ही निवडणूक जिंकणे हे आम आदमी पक्षापुढील सर्वात मोठे आव्हान असून, आम आदमी पक्षाची जागा भाजप घेईल की काँग्रेस, याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तीन वेळा ‘न भूतो’ अशा प्रचंड बहुमताने जिंकलेल्या आम आदमी पक्षाने, जनतेचा विश्वास गमावला आहे. केजरीवाल हे काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यापेक्षाही, अधिक खोटारडे नेते असल्याचा अनुभव दिल्लीकरांनी घेतला आहे. मात्र, या पक्षाच्या फुकट सेवा देण्याच्या आश्वासनांवर दिल्लीतील जनता पुन्हा एकदा भाळते की, आता भाजपला एक संधी देऊन, केजरीवाल यांना धडा शिकविते, ते पाहणे औत्सुक्यपूर्ण होईल.
 
 
राहुल बोरगांवकर