महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण करणार्या ‘दाऊदच्या यारा’ने राष्ट्रवादाचे राजकारण करणार्यांना ‘तडीपार’ म्हणून हिणवणे, हा सर्वस्वी राजकीय दुटप्पीपणाच! म्हणूनच आयुष्यभर ‘भावी पंतप्रधान’ म्हणून मिरवलेल्या या ज्येष्ठ-जाणत्या नेत्याला देशात अथवा राज्यात कधीही राजकीय करिष्मा दाखवता आला नाही, हे वास्तव मान्य करावेच लागेल!
महाराष्ट्रात गेल्या सात ते आठ वर्षांपासून कुरकूर न करणार्या फातिमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या काल्पनिक पात्रास हाताशी धरून हिंदुत्वविरोधी पुरोगामी म्हणवणार्या इकोसिस्टीमने आपल्या कार्यशैलीप्रमाणे फातिमास ‘लार्जर दॅन लाईफ’ ठरवून टाकले. मात्र, या नकली फातिमाचा बुरखा दिलीप मंडल यांनी नुकताच फाडला आणि अखेर या फातिमास डोक्यावर घेऊन गावगन्ना फिरणारे चांगलेच तोंडावर आपटले. देशात अशाप्रकारे ‘नकली अजेंडे’ रेटण्यासाठी मोठी व्यवस्था दीर्घकाळपासून कार्यरत आहे. असो. नकली फातिमाची गोष्ट सांगण्याचे कारण असे की, अशाच प्रकारचे खोटे विधान एका ज्येष्ठ खासदारांनी केले. येथे त्यांचा उल्लेख ‘दाऊदचा यार’ अथवा ‘दाऊदचा सवंगडी’ असे करता येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधातील ते विधान म्हणजे त्यांना तडीपार केल्याचा खोचकपणे केलेला उल्लेख. अर्थात, ‘दाऊदच्या यारा’चे हे वक्तव्य त्यांच्या होत असलेल्या चिडचिडीतून आल्याचे स्पष्ट होते. अमित शाह यांनी रविवारी शिर्डीमध्ये झालेल्या भाजपच्या मेळाव्यात त्या ‘यारा’च्या विश्वासघाताच्या राजकारणावर आपल्या खास शैलीत आसूड ओढले. मराठीजनांनी यंदा 1978 सालापासून सुरू असलेल्या त्या ‘जाणत्या यारा’च्या दगाफटक्याच्या राजकारणास जमिनीत गाडण्याचे काम केल्याचा सणसणीत टोला शाह यांनी लगावला. अशाप्रकारे आपल्या राजकारणाची अंडीपिल्ली बाहेर निघत असल्याचे पाहून, विधानसभा निवडणुकीतील दणदणीत पराभवातून अद्यापही सावरू न शकलेल्या या ‘यार साहेबां’ची चिडचिड होणे म्हणा स्वाभाविकच!
मात्र, ‘यार साहेबां’सारखा राजकारणी ज्यावेळी देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करतो, त्यावेळी ती टीका तथ्यावर आधारित असायला हवी. अर्थात, अशी अपेक्षा करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणीच! कारण, जो व्यक्ती मुख्यमंत्री पदावर असताना मुंबईत खोटा तेरावा बॉम्बस्फोट झाल्याची मुद्दाम पेरणी करतो, त्याच्याकडून अशी अपेक्षा करणेच मुळी व्यर्थ! तर ‘यार साहेबां’नी शाह यांच्यावर टीका केली ती ‘लष्कर-ए-तोयबा’ या मुस्लीम दहशतवादी संघटनेचा हस्तक सोहराबुद्दीन याच्या एन्काउंटरवरून निर्माण करण्यात आलेल्या वादंगावरून. या प्रकरणामध्ये गुजरातचे तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना आरोपी करण्यात आले होते. न्यायालयाने शाह यांना जामीन देताना खटल्याच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी त्यांना गुजरातबाहेर राहण्याची अट घातली होती. त्यानुसार शाह हे गुजरातबाहेर राहत होते. पुढे शाह यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता तर झालीच, त्याचवेळी सोहराबुद्दीनचे एन्काउंटर खोटे असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे शाह यांना त्यामध्ये कोणी, कसे आणि का गोवले, ही माहिती पवारांना नक्कीच असू शकते. त्याचप्रमाणे सोहराबुद्दीन प्रकरण असो की, गुजरात दंगल असो, गुजराचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आणि संपूर्ण हिंदू समाजालाच कसे गुन्हेगार ठरविण्यात आले, याबद्दल ‘यार साहेब’ तर अधिकारवाणीने बोलू शकतील.
अर्थात, तरीदेखील दिशाभूल करणे हेच वैशिष्ट्य असलेल्या ‘यार साहेबां’नी अमित शाह यांना तडीपार म्हटले ते नैराश्यातूनच! त्यांच्या राजकारणाचा पोत पाहिल्यास त्यामध्ये खंजीर खुपसणे, विश्वासघात करणे आणि दिशाभूल करणे ही तीन वैशिष्ट्ये स्पष्टपणे दिसून येतात. वसंतदादा पाटील असोत की, सोनिया गांधी असोत आणि आता अजित पवार असोत, या सर्वांसोबत साहेबांनी एकच ‘पॅटर्न’ राबवला आहे. यामध्ये अजित पवार हे भलतेच चतुर असल्याने त्यांनी ‘यार साहेबां’वर त्यांचाच डाव टाकून त्यांना अतिशय सहजतेने रिंगणाबाहेर ढकलून दिले. त्यामुळेही चिडचीड होणे स्वाभाविकच. ‘यार साहेबां’च्या राजकारणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, भोवती भाट बाळगणे. ही ‘भाट’ नावाची जमात तुपरोट्या रिचवून पवारांच्या प्रत्येक निर्णयाची अगदी गळा फाटेपर्यंत स्तुती करण्यातच इतिकर्तव्यता मानते. त्यामुळेच आजवर त्यांनी मी खूप मोठा राष्ट्रीय नेता असून, दिल्लीचे राजकारण माझ्याच सल्ल्याने चालते असा भ्रम निर्माण केला होता. मात्र, 2014 साली देशात परिवर्तन झाले आणि वासरात लंगडी गाय असल्यासारखे वागणार्यांचा हा भ्रमाचा भोपळा अखेर फुटला.
तसे तर ‘यार साहेबां’च्या राजकारणाची तुलना देशातील त्यांच्या समकालीन अथवा त्यांच्यापेक्षा वयाने लहान असणार्या राजकारण्यांशी केल्यावर त्यांचे राजकारण अगदीच खुजे असल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्रात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांच्या राजकारणाचा पाया यंदा उखडून टाकला आहेच. पण, तरीही ‘यार साहेबां’नी गृहमंत्री शाह यांना लक्ष्य केले. शाह यांचेच राजकारण बघितले, तर ‘यार साहेब’ त्यांच्या पासंगालाही पुरणार नाहीत. 2012-13 सालापासून मेहनत घेऊन उत्तर प्रदेशचे राजकारण 2014 साली बदलणे असो, पुढे पक्षाध्यक्ष असताना भाजपला लोकसभेत 300 पार जागा मिळवून देणे असो, अनेक राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळवून देणे असो, यामध्ये शाह यांची बरोबरी मृगजळछाप राष्ट्रीय नेत्यास करणे शक्य नाही. हे तर झाले फक्त निवडणुकांचे.
पण, अमित शाह हे 2019 सालापासून देशाचे गृहमंत्री आहेत. या कालावधीमध्ये शाह यांच्या कामांचा धडाका बघितल्यास ‘यार साहेबां’ना नक्कीच धडकी भरेल. तब्बल 70 वर्षे देशाची दिशाभूल करणारे ‘कलम 370’ शाह यांनी ज्या कौशल्याने हटविले, त्याचा अभ्यास साहेबांनी करण्याची गरज आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादात घट होणे, तेथील फुटीरतावाद्यांचे जाळे नष्ट करणे, दगडफेक्यांचा कायमचा बंदोबस्त करणे हे देशात आजवर कोणालाच जमले नव्हते. त्याचवेळी जंगलात आणि शहरांमध्ये धुमाकूळ घालणार्या नक्षलवाद्यांचाही ‘करेक्ट’ कार्यक्रम सध्या सुरू आहे. या साफसफाईचा धडाका तर एवढा आहे की, एकेकाळी 100 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये विस्तार असणारा नक्षलवाद आता अवघ्या 30 जिल्ह्यांपुरता उरला आहे. शाह यांनीच पुढाकार घेऊन 150 जुने फौजदारी कायदे रद्द करून ‘भारतीय न्याय संहिता’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ आणि ‘भारतीय साक्ष्य अधिनियम’ लागू करण्याची धमक दाखवली. ईशान्य भारतातील बंडखोरीदेखील इच्छाशक्ती दाखवून शाह यांनी मोडून काढली. त्याचवेळी अमली पदार्थांचे जाळेही उद्ध्वस्त करणे असो, ‘एनआयए’सारख्या तपासयंत्रणांना बळकटी देणे असो किंवा आता सहकारामध्येही आमूलाग्र बदल घडविणे असो, असे चौफेर विषय यशस्वीपणे हाताळण्याची हातोटी शाहंकडे आहे.एकूणच गृहमंत्री अमित शाह हे राजकारणात ‘यार साहेबां’च्या खूप पुढे निघून गेले आहेत. राष्ट्रीय राजकारण तर सोडाच, राज्याच्या राजकारणातही त्यांचा अतिशय दारुण पराभव यंदा झाला. शाह यांच्या राष्ट्रवादाच्या राजकारणाच्या तुलनेत ‘यार साहेबां’चे राजकारण कसे, या प्रश्नाचे उत्तर ‘गुंडगिरी’ या एकाच शब्दात देता येते. त्यासाठी थोडे भूतकाळात जावे लागेल.
महाराष्ट्राच्या राजकारणात आपले बस्तान बसविण्यासाठी ‘यार' साहेबां’नी अनेक गणंगांसोबत घेतले होते. मग वसई, भिवंडी, उल्हासनगरातून असे गणंग त्यांनी जवळ केले आणि त्यांना राजमान्यता मिळवून दिली. त्यांचे धैर्य एवढे वाढले होते की, संरक्षणमंत्री असताना सरकारी विमानातून जे. जे. हत्याकांडातील दाऊदच्या साथीदारांना प्रवास घडवला होता. अशा प्रकारे राज्यात राजकीय गुन्हेगारीचा कळस गाठणार्या ‘यारसाहेबां’ना भाजपचे तडाखेबाज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी संघर्षयात्रा काढून सत्तेतून हद्दपार करून दाखवले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारे गुन्हेगारांना मोकळे रान देणार्या ‘यार साहेबां’ना तडीपार व्हावे लागले नाही, हे त्यांचे नशीब म्हणायचे की महाराष्ट्राचे दुर्दैव? त्यामुळे ‘यार साहेबां’नी विविध संमेलनांच्या स्वागताध्यक्षपदाचे कुटिरोद्योग करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करून आपली कुरकूर थांबवून स्वत:ला सांभाळण्याचीच गरज आहे!