भारत देशाची बदलती भौगोलिक ओळख

    15-Jan-2025
Total Views | 70

how india is recognized geographically

भारताची नेमकी ओळख काय? भारताच्या मुख्य भूमीमधून अनेकदा अनेक राष्ट्र वेगळी झाली. त्यामुळे देशाची भूमी संकुचित झालेली दिसते. मात्र, भारताच्या मुख्य भूमीपासून आक्रमकांनी वेगळे पाडलेले देश सांस्कृतिकदृष्ट्या आजही भारताशी दृढ आहेत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी भारत देशाच्या भौगोलिक, राजकीय इतिहासाबरोबरच सांस्कृतिक इतिहासदेखील अभ्यासणे आवश्यक आहे.भारताच्या संर्वसमावेशक इतिहासाचा घेतलेला हा धांडोळा...
 
 
‘भारत माझा देश आहे’ अशी सुरुवात असलेली प्रतिज्ञा आपण शाळेत म्हणतो. त्या वयात या एका छोट्या वाक्यातील सखोल अर्थाचा आपल्याला बोध होत नसतो. ते एक स्वयंसिद्ध विधान आहे, असेच आपल्याला वाटते. मात्र, थोड्या बारकाईने पुन्हा या छोट्याशा वाक्याकडे पाहिले, तर आपल्याला अनेक उपवाक्ये दिसतात. उदाहरणार्थ, ‘भारत आहे’ हे वर्तमानकाळाचे वाक्य आहे. म्हणजे ‘बॅबिलोनिया होता, भारत आहे.’ तसेच, ‘भारत देश आहे’ आणि ‘भारत माझा आहे’ अशीही दोन उपवाक्ये पाहता येतात आणि त्यांचे अभिप्रेत अर्थ उघड आहेत.
 
त्यातील ‘भारत देश आहे’ हे वाक्य आज आपण थोडे खोलात जाऊन पाहू. बोली भाषेत आपण ‘देश’ आणि ‘राष्ट्र’ हे शब्द समान अर्थाने वापरतो. कधी कधी ‘महाराष्ट्र देश’ असाही शब्दप्रयोग होतो. तेव्हा देश म्हणजे नेमके काय आणि भारत हा जर एक देश आहे, तर तो कोणत्या अर्थाने हे थोडे तपासून पाहायला हवे. भारताची देश म्हणून ओळख कधी निर्माण झाली आणि ती कशी बदलत गेली, असाही थोडासा विचार करून पाहू. ‘देश’ हा शब्द प्रामुख्याने ‘भूमी’ अशा अर्थाने वापरला जातो. एखादा असा भूभाग, जो काही भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे त्याच्या संलग्न भूभागांपेक्षा वेगळा ओळखता येतो, त्यास आपण ‘देश’ अथवा ‘प्रदेश’ म्हणतो. त्यातही ही वैशिष्ट्ये केवळ नैसर्गिक स्वरूपाची नसून, त्या प्रदेशात राहणार्‍या समाजाची संस्कृतीसुद्धा काही वेगळी वैशिष्ट्ये दाखवत असेल, तर अशा भूप्रदेशाची एक वेगळा देश म्हणून ओळख अधिक घट्ट होते.
 
 
भारताची देश म्हणून स्वतंत्र ओळख कधीपासून आहे आणि भारताची भौगोलिक रूपरेषा नेमकी कोणती याचा विचार केल्यास हे सहज लक्षात येते की, हा देश जगातील काही प्राचीन देशांपैकी एक आहे. भारतीय संस्कृतीने प्राचीन काळी जे साहित्य निर्माण केले आहे, त्यात अनेक ठिकाणी या भारतवर्षाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा उल्लेख आढळतो. वेदकाळात भारतातील महत्त्वाच्या नद्यांचा उल्लेख आहे. सिंधू, सरस्वती, गंगा या त्यापैकी प्रमुख. भारतीय प्रदेशात सर्वप्रथम मानवी वस्ती याच भागात झाली असावी. ज्याला आज आपण ‘हिंदू संस्कृती’ असे सर्वसमावेशकपणे म्हणतो. ती संस्कृतीसुद्धा याच प्रदेशात निर्माण झाली. सप्तसिंधूच्या प्रदेशात राहणारे लोक ते हिंदू असे नावही आपल्याला, या नद्यांच्या प्रदेशावरूनच मिळाले. सिंधू-सरस्वती खोर्‍यात साधारण पाच ते सात सहस्र वर्षांपूर्वी राहणार्‍या समाजाचे, पुरातत्त्वीय अवशेष उपलब्ध आहेत. हरप्पा आणि लोथल इथे सापडलेल्या नाण्यांवरून, या समाजाचा मेसोपोटेमिया, बॅबिलोनिया, ग्रीस, इजिप्त यासारख्या देशांशी संबंध येत असे, हे आपल्याला माहीत आहे. पुढे सरस्वती नदी आटत जाऊन आजच्या काळात राजस्थानचे वाळवंट जिथे आहे, त्या प्रदेशात लुप्त झाली आणि ही सर्व मानवी वसाहत पूर्व दिशेला गंगेच्या खोर्‍याकडे सरकली. वेदांची रचना होत असताना, भारतीय भूप्रदेशात होणार्‍या बदलांचे चित्रण या वाङ्मयात आढळते.
 
 
वेदवाङ्मयानंतर भारतीय साहित्यातील महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे पुराणे, रामायण, महाभारत आणि विविध स्मृति ग्रंथ. या ग्रंथांची सुरुवात नेहमी देशकालवर्णनाने होते. यात विश्वाची उत्पत्ती, पृथ्वीची उत्पत्ती, पृथ्वीच्या प्रमुख विभागांची माहितीही आवर्जून येते. ‘जम्बूद्वीपे भरतखण्डे भारतवर्षे’ हा आजही कुठल्याही पूजेच्यावेळी संकल्पासाठी उच्चारण्यात येणारा देशाचा संदर्भ, याच प्राचीन ग्रंथांतून येतो. रामायणात रामाने वनवासात असताना फिरलेला आणि नंतर सीतेच्या शोधार्थ पालथा घातलेला प्रदेश यांचे वर्णन येते. अयोध्या ते लंका असा विस्तृत दक्षिणोत्तर भौगोलिक पट आपल्याला यातून दिसतो. भारतीय युद्धाच्या वर्णनात त्यात सहभागी झालेले राजे भारताच्या कोणत्या भागातून आले, याचे वर्णन येते. अति पश्चिमेचे मद्र-गांधार आणि अतिपूर्वेचे प्रागज्योतिषपुर-ब्रह्मदेश यांचा उल्लेख त्यात येतो. आजच्या नावांनी जर या भूभागाचे वर्णन करायचे ठरवले, तर साधारण अफगाणिस्तानपासून सुरू होऊन म्यानमारपर्यंत पसरलेला हा प्रदेश होता. हा सर्व भूप्रदेश इतक्या भौगोलिक वैविध्याचा आहे की, यात वस्ती करून राहणार्‍या लोकांच्या चालीरितीसारख्या असतील हे अशक्यच. पण, प्राचीन ग्रंथांतील वर्णनावरून असे दिसते की, त्यांच्या जीवनविषयक धारणा फारशा वेगळ्या नव्हत्या. त्यामुळे या विविध प्रदेशात राहणार्‍या विविध राज्यांमध्ये विभागल्या गेलेल्या समाजाचा देश एकच होता, असे म्हणता येते. महाभारतकालीन चक्रवर्ती सम्राट भरत याच्या नावावरून या देशाचे नाव भारत पडले असे म्हणतात. म्हणजेच प्राचीन काळापासून हा एक देश आहे, असे म्हणता येते.
 
 
प्राचीन काळात प्रचंड विस्तार असणार्‍या या देशाने, त्यानंतर मध्यकाळात अनेक आक्रमणांचा सामना केला. इ.स.पू. तिसर्‍या शतकातील अलेक्झांडरच्या आक्रमणापासून, त्यानंतरचे शक, कुशाण व हूण आक्रमणांचे आणि त्यांना यशस्वीपणे परतवल्याचे उल्लेख विविध इतिहास साधनांतून आपल्याला मिळतात. ही सर्व आक्रमणे वायव्य दिशेने झाल्याने, भारताची वायव्य सीमा नेमकी कोणती होती ते आपल्याला माहीत होते. हिंदुकुश आणि पामीर पर्वतरांगा ही या काळातील, पश्चिम आणि वायव्य दिशेची भारताची नैसर्गिक सीमा होती. इसवी सनाच्या तिसर्‍या चौथ्या शतकात भारतातील विविध राज्ये काहीशी स्थिरपद झाल्यानंतर , ही सीमा कायम राहिली. उत्तरेच्या दिशेला हिमालय पर्वत आणि त्यापलीकडे पसरलेले तिबेटचे पठार, या सीमासुद्धा निश्चित होत्या. याच काळात सम्राट अशोक आणि त्यानंतर कनिष्कासारखे कुशाण राजे यांच्या प्रभावाने राजाश्रय मिळालेल्या, बौद्धमताचा प्रसार हा तिबेट आणि त्याच्या पलीकडील चीन प्रांतात झाला. चीन प्रांतातून काही शतकांनंतर भारतात आलेल्या प्रवाशांच्या वर्णनावरून, हे भौगोलिक आकलन योग्य सिद्ध होते.
 
 
याच सुमारास, भारताच्या दक्षिण भागातील राजांनी त्यांचे लक्ष पूर्वेकडे वळवले. या पूर्व दिशेच्या प्रसाराची सुरुवात, शुंग राजवटीत झाली असे म्हणता येईल. त्यापूर्वीही अशोकाने, बौद्धमताच्या प्रसारार्थ त्याचे दूत ब्रह्मदेश आणि त्यापलीकडच्या प्रांतात पाठवले होते. दक्षिणेकडील पल्लव राजे आणि त्यानंतर चोळ राजे यांनी प्रथम व्यापारी आणि नंतर सामरिक मोहिमा आखून, ब्रह्मदेशाच्या पलीकडील थायलंड, कंबोडिया, मलेशिया, जावा-सुमात्रा बेटे इत्यादी भूभाग अंकित केला. सामरिक विजयापाठोपाठ, या सर्व प्रदेशात सांस्कृतिक संबंध अधिक दृढत्वाने प्रस्थापित झाले.
 
 
इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंत असे म्हणता येईल की, भारत देशाची सीमा विस्तारत होती आणि सांस्कृतिक प्रभाव क्षेत्र त्याहून विस्तृत भूभागावर पसरलेले होते. याच सुमारास पश्चिम सीमेवर आक्रमणांची नवी लाट सुरू झाली होती. इस्लामच्या उदयानंतर शतकभरातच अरेबिया आणि पर्शिया पादाक्रांत होऊन, भारताच्या सीमेवर मुसलमानी स्वार्‍या सुरू झाल्या होत्या. काही शतकांच्या झुंजीनंतर त्यांना भारतात राज्य स्थापन करणे शक्य झाले आणि हळूहळू भारताच्या जवळपास सर्व भूमीवर, मध्यपूर्वी वंशाच्या मुसलमानी राजवटींची सत्ता प्रस्थापित झाली. या पहिल्या देशव्यापी आक्रमणातसुद्धा भारताची देश म्हणून असलेली मूळ ओळख, फारशी बदललेली नव्हती. ‘अटक ते कटक’ या मराठी साम्राज्याच्या भौगोलिक आकांक्षांचा उच्चार, हा प्राचीन काळच्या ‘आसिंधुसिंधु’ घोषणेपेक्षा फारसा वेगळा नव्हता. त्यामुळे परचक्र आल्याने आपल्या संकल्पनेतील देश लहान झाला असे नाही.
 
 
इसवी सनाच्या पंधराव्या शतकापासून व्यापारी उद्देशाने स्थापन झालेल्या युरोपातील विविध ईस्ट इंडिया कंपन्या, वसाहती निर्माण करण्याचा उद्देश धरून या सर्व प्रदेशात आल्या. पूर्वेकडच्या सयाम, सुमात्रा आदि देशांमध्ये त्यांची सत्ता तुलनेने आधी प्रस्थापित झाली. परंतु, कालांतराने भारताच्या मुख्य भूमीवरसुद्धा इंग्रज राजवट प्रस्थापित झाली. मुसलमानी राजवटींपासून बहुतांश भागात पुन्हा प्राप्त केलेले स्वातंत्र्य फारसे टिकले नाही आणि देश पुन्हा पारतंत्र्यात गेला. इंग्रजांनी त्यांच्या राजवटीत भारताचे जे तुकडे केले, ते आजच्या काळापर्यंत वेगळेच राहिलेले आपल्याला दिसतात. 1937 साली प्रशासनिक सोय म्हणून वेगळा काढलेला ब्रह्मदेश, संस्थान म्हणून स्वतंत्रच राहिलेले नेपाळ आणि श्रीलंका, इस्लामच्या आधारावर वेगळे झालेला पाकिस्तान आणि त्याच्यातून पुन्हा फुटून वेगळा झालेला बांगलादेश असे अनेक तुकडे झालेला आणि पुन्हा संकुचित झालेला भारत आपण आज पाहतो.
 
 
पण, आज जे तुकडे आपण पाहतो तसे तुकडे भारतात, सर्वच काळात असलेले आपला इतिहास सांगतो. रामायणात अयोध्या, किष्किंधा आणि लंका ही राज्ये वेगळीच होती. महाभारत काळात विविध राजे आणि त्यांच्या अधिपत्याखालील प्रदेश अशी वर्णने आहेत. उत्तरेला शुंग आणि गुप्त राजे होते, तेव्हा दक्षिणेला सातवाहन राजे होतेच. त्याही दक्षिणेला पल्लव, चोळ, चेर, पांड्य ही विविध काळात भरभराटीस आलेली राज्ये होती. त्यांच्या भूप्रदेशात चढउतार होतच होते. इस्लामी राजवटी प्रस्थापित झाल्यानंतरसुद्धा राजपूत, मराठे, अहोम इत्यादी राजे त्यांच्या प्रदेशात स्वतंत्र राजवटी स्थापितच होते. मग आपण ज्या भारत देशाबद्दल बोलत आहोत, तो देश नेमका कोणता आणि त्याची भौगोलिक ओळख बदलती आहे म्हणजे काय?
 
 
फ्रेंच राज्यक्रांतीच्या सुमारास युरोपात जी राष्ट्रवाद संकल्पना प्रस्थापित झाली, तिच्यात प्रत्येक राष्ट्राने स्वतःचे राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करणे स्वाभाविक मानले गेले. यालाच ‘राष्ट्र-राज्य संकल्पना’ म्हणतात. त्याचाच व्यत्यास म्हणजे, स्वतंत्र होऊ पाहणारे प्रत्येक राज्य हे वेगळे राष्ट्रच असते असेही संयुक्तिक मानले गेले. युरोपातील राष्ट्रसंकल्पना, वैचारिक वसाहतवादामुळे संपूर्ण जगात लागू केली गेली. त्यामुळे भारत हाही एक राष्ट्रांचा समूह आहे, अशी कल्पना अनेकदा मांडली जाते. परंतु, भारताची राष्ट्रसंकल्पना तशाच प्रकारे निर्माण झालेली नाही. त्यामुळे वेगवेगळी राज्ये असली, तरी त्यातील सर्वसामान्य लोकांची समाजधारणा एकाच प्रकारची होती. समाजाच्या अन्य व्यवस्था राज्याधिष्ठित नसल्याने, त्यांना हे सीमाभेद लागू नव्हते. त्यामुळेच भारतीय राज्यकर्ते जरी आग्नेय आशियामधून मागे फिरले, तरी सांस्कृतिक प्रभाव त्यानंतरही कित्येक शतके टिकून राहिला आहे.
म्हणूनच ‘भारत देश आहे’ हे वाक्य समजून घेताना युरोपचा चश्मा उतरवून, या वाक्याचा भारतीय संस्कृतीला अभिप्रेत अर्थ काय ते समजून घ्यायला हवे. आजचा भौगोलिक भारत म्हणजे केवळ भारतीय संघराज्य की समानधर्मी नेपाळही त्याचा भाग आहे आणि हट्टाने दूर झालेला पाकिस्तान नकाशावर बाजूलाच असला, तरी सांस्कृतिकदृष्ट्या किती दूर आहे, याचाही विचार व्हायला हवा. भारत देशाची आपली व्याख्या ही आपल्या प्रकृती स्वभावानुसारच असेल. (Geography of India)
 
 
- डॉ. हर्षल भडकमकर

(लेखकाने मुंबईतील टी.आय.एफ.आर. येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’पर्यंत शिक्षण घेतले आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत आहेत. ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य अशी त्यांची जबाबदारी आहे.)


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121