पेंच व्याघ्र प्रकल्पात काळ्या गिधाडाचे दुर्मीळ दर्शन

    15-Jan-2025
Total Views |
Cinereous Vulture


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
पेंच व्याघ्र प्रकल्पात काळ्या गिधाडाचे दुर्मीळ दर्शन घडले आहे (Cinereous Vulture). 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या (बीएनएचएस) जीवशास्त्रज्ञांनी या गिधाडाची नोंद केली आहे (Cinereous Vulture). 'बीएनएचएस'कडून व्याघ्र प्रकल्पात सुरू असलेल्या गिधाड संवर्धन प्रकल्पाअंतर्गत गिधाडांना खाण्यासाठी टाकलेल्या मृत जनवाराच्या कलेवरावर हे गिधाड उतरले होते (Cinereous Vulture). युरेशियाच्या भागात अधिवास करणारी ही गिधाडे भारतात हिवाळी स्थलांतर करतात. (Cinereous Vulture)
 
 
'बीएनएचएस'ने आॅगस्ट महिन्यात गिधाड संवर्धन प्रकल्पाअंतर्गत पिंजोरी येथून पैदास करुन आणलेल्या दहा लांब चोचीच्या गिधाडांना म्हणजेच भारतीय गिधाडांना पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडले आहे. या प्रकल्पाचे काम सध्या व्याघ्र प्रकल्पात सुरू आहे. याअंतर्गत गिधाडांना खाद्य पुरवलेले जाते. ५ जानेवारी रोजी गिधाडांंना खाण्यासाठी मृत रानडुक्कराचे कलेवर टाकण्यात आले होते. या कलेवरावर ४ भारतीय गिधाडे, १७ पांढऱ्या पुठ्ठ्याची गिधाडे आणि १ हिमालयीन गिधाड उतरलेले होते. यावेळी काळे गिधाड देखील कलेवरावर उतरुन खाऊ लागले. याठिकाणी लावलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही बाब 'बीएनएचएस'चे जीवशास्त्रज्ञ मनन सिंग महादेव, फील्ड असिस्टंट मोहम्मद कासिम आणि व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी अनिकेत गाताडे यांनी टिपली.
 
 
काळ्या गिधाडाच्या महाराष्ट्रातील यापूर्वीच्या नोंदी या पुणे आणि अमरावती जिल्ह्यामधून आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून या गिधाडाची नोंद करण्यात आली होती. हे गिधाड प्रामुख्याने युरेशियातील बऱ्याचश्या भागात आढळते. जगातील दोन सर्वात मोठ्या गिधाडांच्या प्रजातींमध्ये काळ्या गिधाडाचा समावेश होतो. या पक्ष्याची लांबी १.२ मी., पंखांची लांबी ३.१ मी. आणि वजन १४ किलोग्रॅम असते. काळे गिधाड बरेच मोठे आणि रुबाबदार असल्यामुळे त्याला ‘गृध्रराज’ म्हणतात. हे गिधाड प्रामुख्याने हिवाळी स्थलांतरदरम्यान मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानमधील गवताळ प्रदेशांमध्ये दिसते.