भारतीय अर्थव्यवस्थेला खनिज तेल दरवाढीचा फटका बसणार ?
अमेरिकेने रशियावर घातलेल्या निर्बंधांचे जगभर पडसाद
14-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : लांबलेले रशिया - युक्रेन युध्द, इस्त्राइल - हमास संघर्ष यांमुळे आधीच जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असताना एका नव्या चिंतेची भर पडली आहे. अमेरिकेने रशियातील खनिज तेल खरेदीवर घातलेले निर्बंध यांमुळे जागतिक बाजारात खनिज तेलांच्या किंमतींचा भडका उडाला आहे. नुकतेच खनिज तेलांच्या किंमतींनी प्रती बॅरल ८२.५० डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर नवीन पेच उभा राहणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेकडून रशियाकडून होणाऱ्या खनिज तेल खरेदीवर निर्बंध घातले गेले आहेत त्यामुळे रशियाकडून जे देश तेल खरेदी करू शकत होते त्यावर आता निर्बंध आले आहेत. त्याचा थेट फटका भारतासारख्या देशांना बसणार आहे. भारताच्या एकूण तेल आयातीमधील ४०-४५ टक्के इतका मोठा हिस्सा हा रशियाकडून होणाऱ्या आयातीचा आहे. यात अजून महत्वाची गोष्ट म्हणजे रशिया कडून होणाऱ्या आयातीमध्ये भारताला प्रती बॅरल ३ डॉलरची सुट मिळत होती जी आता या नव्या निर्बंधांमुळे मिळणार नाही.
या सर्व गोष्टींचा थेट फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे. आता भारताला आखाती देशांकडून चढ्या दराने तेल खरेदी करावे लागणार असल्याने आता भारतातील पेट्रोल - डिझेल यांच्या किंमतीत वाढ होऊ शकते. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरील महागाईचा दबाव वाढू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.