भारतीय किरकोळ महागाई दर ४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर!

डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर ५.२ टक्क्यांवर

    14-Jan-2025
Total Views |
 
 
retail
 
 
 
 
नवी दिल्ली : गेले काही महिने महागाईच्या फटक्याने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय बाजारातील किरकोळ महागाई दराने ४ महिन्यांचा नीचांकी दर गाठत ५.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने नुकत्याच सादर केलेल्या आकडेवारीतून ही माहीती समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यातील ५.४८ टक्क्यांवरुन ०.४० टक्क्यांची घट झाली आहे. यांमुळे सामान्यांच्या खिशाला दिलासा मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असणारा ४ टक्क्यांचा किरकोळ महागाई दर अजूनही गाठणे शक्य झालेले नाही. ग्राहकांनी वेळोवेळी खरेदी विक्री केलेल्या वस्तुंचा समावेश किरकोळ महागाई दर मोजताना होतो.
 
 
२०२४ या वर्षात किरकोळ महागाईने सातत्याने उच्चांकच गाठला होता, ऑक्टोबर महीन्यात तर किरकोळ बाजारातील महागाईने १४ महिन्यांची उच्चांकी पातळी गाठत ६.२ टक्क्यांची पातळी गाठली होती. खाद्य पदार्थ आणि ऊर्जा क्षेत्र वगळून जी मूलभूत चलनवाढ आहे त्यातसुध्दा घट झाली असून डिसेंबर महिन्यात हा दर ३.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. यात सर्वात मोठा वाटा हा देशातील या महिन्यांमध्ये आलेल्या सणासुदीच्या काळाने हातभार लावला आहे.
 
 
किरकोळ महागाई दर कमी होत असला तरी खाद्य पदार्थांच्या किंमती अजूनही चढ्याच आहेत. भाजीपाल्याच्या किंमतीत डिसेंबर महिन्यात २६. ५६ टक्क्यांनी वाढल्या. ऑक्टोबर महिन्यात हीच वाढ ४२.१८ टक्के होती, तर नोव्हेंबर मध्ये हीच वाढ २९.३३ टक्के होती. त्यातुलनेत डिसेंबर मध्ये किंमती घसरल्या असल्या तरी त्या चढ्याच आहेत. कडधान्यांच्या किंमती डिसेंबर महिन्यात ९.६७ टक्क्यांनी वाढल्या. तर डाळींच्या किंमती ३.८३ टक्क्यांनी वाढल्या.
 
 
या खाद्यपदार्थांच्या किंमती गेल्या काही काळापासून चढ्याच राहील्या असून तो एक मोठा चिंतेचा विषय आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही याबद्दल चिंता व्यक्त केली असून येत्या काळात खनिज तेलांच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. त्याचाही परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे.