महाकुंभमेळ्यात, आज मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्रयागराज येथे पहिले अमृतस्नान होत आहे. तब्बल २५ हजार कोटींची उलाढाल या महाकुंभमेळ्यात होईल, असा अंदाज आहे. अर्थकारणाच्या सर्व घटकांना चालना देणारा हा महाकुंभ आहे. त्याचे दूरगामी सकारात्मक परिणाम येणार्या काळात दिसून येतील.
महाकुंभमेळ्यात आज मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्रयागराज येथे पहिले अमृतस्नान होत आहे. महाकुंभात एकूण सहा स्नान होणार असून, त्यांपैकी तीन शाहीस्नान असतील. दुसरे शाहीस्नान दि. २९ जानेवारीला मौनी अमावस्येला, तर तिसरे दि. ३ फेब्रुवारीला वसंत पंचमी रोजी होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी पुष्पवृष्टी करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. प्रयागराज येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेत, अयोध्या तसेच काशी येथेही मोठी गर्दी होईल या शक्यतेने, तेथेही त्यांच्यासाठी सर्व सुविधा सज्ज ठेवण्यात येत आहेत. भाविकांना येथे पोहोचण्यास कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रेल्वे स्थानक, विमानतळ आणि बसस्थानकावरील पर्यटक माहिती केंद्रांच्या माध्यमातून, याबाबतची माहिती दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी, एक असलेला कुंभमेळा दर १२ वर्षांनी भरतो. लाखो भाविक, पर्यटक, व्यापारी यांना एकत्र करणारा हा उत्सव. तो केवळ एक उत्सव नाही, तर अर्थकारणाला चालना देणारी ती एक मोठी घटना आहे, पर्वणी आहे. महाकुंभ मेळाव्याचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण असेच असले तरी, आजच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला आकार देणारी ती एक महत्त्वाची घटना आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे लाखो भाविक येतात, त्यामुळे मागणी वाढते. भारतासह जगभरातून भाविक यावेळी उपस्थित राहतात. त्यामुळे प्रवासाबरोबरच, स्थानिक व्यवसायांना त्याचा थेट लाभ मिळतो. स्थानिक आतिथ्य उद्योगाला यात सर्वाधिक फायदा होतो. त्याचबरोबर, मेळाव्यात हिंदू धर्मात महत्त्व असलेल्या विविध धार्मिक कलाकृतींची विक्रीही जोरात होते. दानधर्म करण्यासाठी तसेच वैयक्तिक वापरासाठी जी खरेदी केली जाते, त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांना सुगीचे दिवस येतात. बाजारपेठांमध्ये विक्रमी उलाढाल होते. मोठमोठे व्यावसायिकही यात आपल्या उत्पादनांची विक्री करतात. म्हणजेच, एक आर्थिक परिसंस्था महाकुंभच्या निमित्ताने उदयास येते, असे म्हटले तर ते फारसे चुकीचे ठरणार नाही.
कुंभमेळ्यामुळे तात्पुरत्या आणि दीर्घकालीन अशा अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होतात. स्थानिक लोकसंख्येला, पर्यटकांच्या गर्दीमुळे निर्माण होणार्या रोजगारांचा फायदा होतो. यात आतिथ्य सेवा, वाहतूक आणि सुरक्षा यांचा उल्लेख करावा लागेल. याव्यतिरिक्त, तंबू उभारणारे कामगार, अन्नपदार्थांच्या विक्रीच्या ठेल्यावरचे कामगार आणि कार्यक्रमस्थळांवर स्वच्छता राखणारे कर्मचारी यांचा उल्लेख करता येईल. जेथे रोजगाराच्या संधी मर्यादित असतात, अशा भागात रोजगार प्रदान करतो, हे महत्त्वाचे. त्याशिवाय, कुंभमेळ्याच्या यशस्वीतेसाठी सरकार पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद करते. भाविकांच्या सोयीसाठी या सुविधा आवश्यक अशाच असतात. यात रस्ते, सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा तसेच सुरक्षा यांचा समावेश होतो. या पायाभूत सुविधा उत्सवानंतरही स्थानिकांना कायमस्वरुपी लाभ देणार्या ठरतात. वाढलेल्या पायाभूत सुविधांमुळे, त्यानंतरच्या काळात पर्यटनाला विशेषत्वाने चालना मिळते.
या उत्सवादरम्यान, अर्थव्यवस्थेत कंपन्यांची भूमिकाही कळीची असते. दिग्गज कंपन्या प्रायोजकाची भूमिका पार पाडतात. आपल्या उत्पादनांच्या प्रचारासाठी या कंपन्या कुंभमेळ्यात सक्रियपणे सहभागी होतात. आपल्या उत्पादनांना लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी हा कुंभमेळा उपलब्ध करून देतो. अनेक कंपन्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत आरोग्य उपक्रम, स्वच्छता मोहिमा यांना पाठिंबा देतात. महाकुंभासाठी केलेली तरतूद ही ५ हजार, ४३५ कोटी इतकी आहे. १८८२ साली जो महाकुंभ झाला, तेव्हा देशाची लोकसंख्या २२.५ कोटी इतकी होती, तर आठ लाख भाविकांनी संगमामध्ये स्नान केले होते. २०१९ सालच्या कुंभ मेळ्यासाठी ४ हजार, २०० कोटी खर्च आला होता. यावेळच्या महाकुंभासाठी, सात हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाचा अंदाज आहे. म्हणजेच, केवढे मोठे अर्थकारण महाकुंभाच्या भोवती आहे, याचा अंदाज येतो. उत्तर प्रदेश सरकारने सात हजार अतिरिक्त बसची सुविधा केलेली आहे. भाविकांना संगमावर पवित्र स्नान करता यावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून बसेसची सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या कुंभमेळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मोठी रेलचेल असते. त्यामुळे, सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळते. सांस्कृतिक कार्यक्रमांशी संबंधित सर्व घटकांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच, चांगले उत्पन्न मिळण्याचे काम यादरम्यान होते.
२०१३ मध्ये जो महाकुंभ झाला, तेव्हा नेमके काय घडले, हे पाहाणे रंजक ठरते. दि. १४ जानेवारी ते दि. १० मार्च २०१३ पर्यंत ५५ दिवस तो चालला होता. या कुंभमेळ्याला १२ कोटींपेक्षा जास्त यात्रेकरूंनी भेट दिली होती. दि. १० फेब्रुवारी २०१३च्या शिखर स्नानाच्या दिवशी अर्थात मौनी अमावस्येला तब्बल तीन कोटी भाविकांची उपस्थिती होती. ४ हजार, ५०० तात्पुरती निवारा केंद्रे यावेळी उभारण्यात आली होती, तर मोठ्या प्रमाणावर तंबू उभारले गेले होते. ३० हजार पोलिसांनी सुरक्षेची जबाबदारी सांभाळली होती. आरोग्यसेवेसाठीच एक हजाराहून अधिक वैद्यकीय शिबिरे उभारण्यात आली होती. त्याशिवाय आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी , रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. त्यावेळी स्थानिक व्यवसायांना सुमारे ७५ अब्ज रुपये मिळाले, असा एक अंदाज आहे. म्हणजे उलाढाल किती झाली, याचा अंदाज बांधता येतो. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने महाकुंभसाठी ६ हजार, ९९० कोटी रुपयांच्या तरतुदीसह,पायाभूत सुविधांच्या विकासापासून स्वच्छतेपर्यंत ५४९ प्रकल्प राबवले आहेत. महाकुंभमुळे २५ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल. तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दोन लाख कोटी रुपयांचा आर्थिक परिणाम होईल, असा अंदाज आहे. यात पूजेच्या वस्तूंपासून पाच हजार कोटी रुपये, दुग्धजन्य पदार्थांमधून चार हजार कोटी रुपये आणि फुलांपासून ८०० कोटी रुपयांची उलाढाल होईल असे मानले जात आहे. प्रत्यक्षात हा आकडा भाविकांच्या संख्येनुसार, वाढू शकतो. म्हणूनच, महाकुंभ हा केवळ एक आध्यात्मिक मेळा नाही, तर अर्थकारणाला गती देण्याची अद्भुत क्षमता त्यात आहे. कुंभमेळा हा म्हणूनच एक पवित्र पर्वणी तर आहेच, त्याशिवाय, ती एक महत्त्वपूर्ण अशी आर्थिक घटनाही आहे.
संजीव ओक