मुंबई : अनेक गुंतवणुकदारांच्या सर्वच आशा आकांक्षांवर पाणी फिरवत भारतीय शेअर बाजाराने आज ऐतिहासिक पडझड अनुभवली. सेन्सेक्समध्ये तब्बल १०३१ अंशांची पडझड होत बाजार ७६, ३४७ अंशांवर थांबला. तिकडे निफ्टीमध्येही निराशाच होत ३४५ अंशांची मोठी घसरण अनुभवायला मिळाली. स्मॉलकॅप आणि मिडकॅप इंडेक्स मध्ये जोरदार पडझड झाली.
पडझडीची प्रमुख कारणे
या ऐतिहासिक घसरणीची काही प्रमुख कारणे आहेत. पहीले कारण म्हणजे अमेरिकेकडून रशियावर लादले गेलेले निर्बंध. अमेरिकेकडून रशियातील खनिज तेल उत्पादनावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किंमती भरमसाठ वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. रुपयाने डॉलरच्या तुलनेत ८६.२७ चा ऐतिहासिक तळ गाठला आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह कडून केल्या गेलेल्या व्याज कपातीमुळे परदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय बाजारातून २१ हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झाली घसरण
अदानी इंटरप्रायझेस, बीपीसीएल, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, भारत इलेक्ट्रॉनिक्स या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर याउलट हिंदुस्थान युनिलिव्हर, अॅक्सिस बँक, टीसीएस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.