निरोगी, निरामय जीवनासाठी ‘आजीबाईचा बटवा’ जपा

रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत वैद्य सुविनय दामले यांचा सल्ला

    13-Jan-2025
Total Views |
Vaidya Suvinay Damle

ठाणे : “आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, निरामय जीवन जगता येते. मात्र, बदलत्या काळानुसार आरोग्यनीती बदलली आहे. काळाच्या ओघात अनेक घरगुती उपाय सांगणारा आजीबाईचा वटवा काळाच्या ओघात लोप पावत आहे. ही रुढी, परंपरा आपणच जपली पाहिजे,” असा मौलिक ( Rambhau Mhalgi ) सल्ला वैद्य सुविनय दामले यांनी दिला.

ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या पटांगणात सुरू असलेल्या कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत शनिवार, दि. ११ जानेवारी रोजी वैद्य दामले यांनी ‘आजीबाईचा बटवा’ यावर श्रवणीय आणि उद्बोधक व्याख्यान दिले. यावेळी व्याख्यानमाला सत्राच्या अध्यक्ष ज्योती भोजने, विद्याधर वैशंपायन आदींसह मान्यवर उपस्थित होते. आ. संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली गेली ३९ वर्षे ही व्याख्यानमाला अखंडितपणे सुरू आहे.

“अनेक आक्रमणे झाली, तरी आयुर्वेद पुसला गेला नाही की, पूर्वीच्या रुढी-परंपरा बदललेल्या नाहीत. आयुर्वेदाच्या माध्यमातून तुम्ही निरोगी, निरामय जीवन जगू शकता. पूर्वीचे आयुष्य पुन्हा मिळवायचे असेल तर धर्मपालन, गावपालन, अर्थपालन आणि मोक्षप्राप्ती इथून सुरुवात करणे आवश्यक आहे,” असे सांगून वैद्य दामले यांनी यांनी, पंचमहाभुतांसह जठराग्नी, अशा १३ अग्नीने हे शरीर बनलेले आहे. या अग्नीमध्ये कमी-जास्तपणा निर्माण झाला की, रोग होतो. त्यासाठी या अग्नींची पुनर्स्थापना करणे आयुर्वेद तज्ज्ञांचे काम आहे. सुखकर असेल ते हितकारक असेलच, असे नाही. जिवंत राहण्यासाठी औषधे लागतात, हा भ्रम आहे. धर्म, परंपरा, कर्मकांड यात आरोग्य दडलेले असल्याचे सांगताना त्यांनी वैदिक हिंदू धर्माचे अनेक दाखले दिले. जेवण्यासाठी न जगता मोक्षप्राप्तीसाठी जगा. खाल्लेले पचन होण्यासाठी तसेच शरीरासाठी आपल्या संस्कृतीत प्रदक्षिणा, लोटांगण हेच योग्य व्यायाम आहेत. तेच प्रत्येकाने करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

‘जे देवासाठी ते देहासाठी’ ही संकल्पना फक्त भारतामध्येच आहे. हठयोगी बनले पाहिजे. पूर्वी अनेक घरगुती उपाय केले जात याचा ऊहापोह करताना दामले यांनी, आजी म्हणायची चूळ भरल्याशिवाय घरात प्रवेश नाही. दृष्ट काढणे, ओवाळणी करणे म्हणजे शक्तीने तेजाची उपासना होय. स्त्रीकडून पुरुषाला ओवाळणे, अग्निहोत्र, यज्ञ केल्याने कार्बन पार्टीकल तयार होऊन परिसर स्वच्छ व पवित्र होतो. मात्र, हे उपाय सांगणारा आजीबाईचा बटवा काळाच्या ओघात नष्ट होत आहे. आता तर आजीच वृद्धाश्रमात पोहोचले आहेत, अशी खंत व्यक्त करून त्यांनी ही रुढी-परंपरा जपण्याचे आवाहन श्रोत्यांना केले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या व्याख्यानाचा समारोप कस्तुरी परांजपेने गायलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताने झाला.

सुवेर, सुतक पाळणे म्हणजे क्वारंटाईन?

पाप-पुण्य, पवित्र-अपवित्र हे फक्त भारतातच सांगितले जाते. अन्यत्र, जगात कुठेही नाही, असे स्पष्ट करीत दामले यांनी, सुवेर-सुतक पाळणे तसेच चार दिवस मासिक पाळीत विलग बसणे हे क्वारंटाईन नव्हे काय? असा सवाल करून वैद्य दामले यांनी आरोग्याच्या दृष्टीने या चांगल्या प्रथा आहेत. हे अस्पृश्य नाही, तर अस्पर्श असल्याचे सांगितले.

वृद्धाश्रम भारताची संस्कृती नाही

वानप्रस्था विषयी भाष्य करताना वैद्य सुविनय दामले यांनी, आताच्या विवाह संस्कृतीचे वाभाडे काढत वृद्धाश्रमाचे कटू वास्तव मांडले. जेवढे भारतात वृद्धाश्रम जास्त तेवढी भारताची संस्कृती कोलमडली आहे. जेव्हा भारतातील वृद्धाश्रम बंद होतील, तो सुदिन असेल आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासून करायची आहे. तरच पुन्हा भारतीय संस्कृतीने जन्म घेतला, असे दिसेल. ’आपणाला वृद्धाश्रमात टाकले जाऊ नये, याची काळजी आपणच घ्यावी, अशी कोपरखळीही त्यांनी श्रोत्यांना मारली.