नवी दिल्ली : ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ (इस्रो)ने ( ISRO ) स्पेस डॉकिंग प्रयोग (स्पेडेक्स)ची यशस्वी चाचणी घेतली. ‘इस्रो’ने रविवार, दि. १२ जानेवारी रोजी दोन अवकाश उपग्रहांमधील अंतर प्रथम १५ मीटर, नंतर तीन मीटर ठेवले. यानंतर दोन्ही उपग्रहांना पुन्हा सुरक्षित अंतरावर नेण्यात आले आहेत.
‘इस्रो’ने सांगितले की, “डॉकिंग चाचणीचे डेटा विश्लेषण केले जात आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. स्पेडेक्स मिशनचे डॉकिंग दोनदा पुढे ढकलण्यात आले आहे. प्रथम दि. ७ जानेवारी आणि नंतर दि. ९ जानेवारी रोजी डॉकिंग करण्यात येणार होते. ‘इस्रो’ने दि. ३० डिसेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून रात्री १० वाजता स्पेडेक्स म्हणजेच अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम सुरू केली होती. या अंतर्गत ‘पीएसएलव्ही-सी६०’ रॉकेटच्या साहाय्याने पृथ्वीपासून ४७० किमीवर दोन अंतराळयान तैनात करण्यात आली आहेत. मोहीम आणखी यशस्वी झाल्यास रशिया, अमेरिका आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल. भारताच्या ‘चांद्रयान-४’ मोहिमेच्या यशावर अवलंबून आहे, ज्यामध्ये चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. ‘चांद्रयान-४’ मिशन २०२८मध्ये लॉन्च केले जाऊ शकते.