आपल्या मधुर वाणीने आणि संयमित स्वभावाने पक्षाच्या वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेत पक्षाला नवी दिशा देणार्या भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त...
कितीही कठीण परिस्थिती असली, तरी राखेतून झेप घेणार्या फिनिक्स पक्ष्याला कुणीही थांबवू शकत नाही, हे वाक्य भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजकीय प्रवासाला पुरेपूर लागू होते. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड ही केवळ त्यांच्या पदासाठीची ओळख नाही, तर एका संघर्षमय जीवनातून घडलेल्या नेतृत्वाची साक्ष आहे. त्यांच्या या प्रवासात निष्ठा, परिश्रम आणि संघटन या गुणांनी त्यांना एक परिपूर्ण नेते बनवले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात झाला. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही, त्यांनी सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा दिला.
१९९७ साली बावनकुळे यांनी कोराडी मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येत, आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. २००२ साली ते पुन्हा निवडून आले आणि नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बनले. त्यांचे संघटन कौशल्य आणि कर्तृत्व बघून भाजपने त्यांना, विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले.
२००४, २००९ आणि २०१४ साली, त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा विजय मिळवला. २०१४ साली ते फडणवीस सरकारमध्ये ऊर्जा आणि उत्पादन शुल्कमंत्री म्हणून नियुक्त झाले. नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. या काळात महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
२०१९ सालचा धक्का आणि नव्या संघर्षाची सुरुवात
२०१९ साली चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधानसभेचे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर, त्यांच्या पत्नीचेही तिकीट नाकारण्यात आले. या परिस्थितीतही त्यांनी संयम राखला आणि पक्षनिष्ठा तसूभरही ढळू दिली नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांचा राजकीय प्रवास संपुष्टात आला, असे भाकित त्यावेळी अनेकांनी व्यक्त केले. पण, त्यांनी ही परिस्थिती संधी म्हणून पाहिली. पराभवातही नवी वाट शोधणारेच खरे विजेते होतात, या विचारसरणीने त्यांनी आपली ऊर्जा पक्षाच्या बांधणीसाठी वळवली. सरचिटणीस म्हणून त्यांनी पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली, महाराष्ट्र पिंजून काढला आणि युवा मोर्च्याच्या प्रभारीपदाची जबाबदारीही समर्थपणे पार पाडली.
पायाला भिंगरी, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर या उक्तीला त्यांनी खर्या अर्थाने साकारले. कार्यकर्त्यांशी आपुलकीने संवाद साधत, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि आधार दिला. त्यांच्या या कृतीतून फक्त एक नेता म्हणून नाही, तर कार्यकर्त्यांचा विश्वासू साथीदार म्हणून उभे राहिले. याच गुणवैशिष्ट्यामुळे भाजपने त्यांना, ऑगस्ट २०२१ साली प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली.
फडणवीस आणि बावनकुळे: जोडगोळीची ताकद
महाराष्ट्र भाजपच्या वाढीत, स्वर्गीय प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या जोडीचा सिंहांचा वाटा आहे. संघटन कौशल्याचा हा वारसा पुढे चालवण्याचे काम नव्या जोडीने केले, ती जोडगोळी म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे. या दोघांचे नाते हे केवळ सहकार्याचे नाही, तर एकमेकांना समजून घेणार्या नेत्यांचे आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बावनकुळे यांनी चमकदार कामगिरी केली. नेतृत्वाची खरी परीक्षा ही साथीदारांच्या विश्वासातून होते, हे फडणवीस आणि बावनकुळे यांच्या कामातून दिसून आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात, चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या विश्वासू सहकार्यांपैकी एक होते. त्यांचे नाते केवळ पदापुरते मर्यादित राहिले नाही, तर ते संघटन कार्याच्या माध्यमातून अधिक दृढ झाले. ‘सिंहाच्या सोबतीने वाघालाही त्याची ताकद मिळते,’ या म्हणीप्रमाणे, फडणवीस आणि बावनकुळे यांनी एकत्रित काम करत, पक्षाला महाराष्ट्रात प्रचंड यश मिळवून दिले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी बसवण्याचे स्वप्न बघितले आणि ते साकार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या परिश्रमामुळेच, महाराष्ट्रात भाजपने यशाचे नवे शिखर गाठले. फडणवीस यांचा विश्वास आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची मेहनत, या संयोगाने भाजपला एका नव्या उंचीवर नेले.
संघटन कौशल्याचा परमोच्च उदाहरण
चंद्रशेखर बावनकुळे यांचे नेतृत्व म्हणजे, संघटन कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. नेतृत्व हे जबाबदारीचे नाही, तर विश्वासाचे ओझे आहे या भावनेने त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचा प्रवास केला. पक्षापासून दूर गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी पुन्हा पक्षाशी जोडले. माणसे जिंकण्याची कला ज्याच्याजवळ असते, तोच खरा नेता होतो हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले.
त्यांचे घर हे कार्यकर्त्यांसाठी नेहमीच उघडे दार असलेले ठिकाण होते. घरात आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा चहा, नाश्ता, जेवण याचे नियोजन ते स्वतः पाहायचे. आपलेपणाची भावना ही माणसांना जोडते, हे त्यांच्या वागण्यातून वारंवार दिसून आले. त्यांचा स्नेह, आपुलकी आणि आत्मीयता यामुळेच ते कार्यकर्त्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करू शकले. परिणामी, त्यांनी कार्यकर्त्यांची मनही जिंकली.
भाजपच्या विजयात सिंहाचा वाटा
२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले. पण, विधानसभेला मिळालेला ऐतिहासिक विजय, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संघटन कौशल्याचा परिपाक होता. त्यांनी केवळ कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले नाही, तर पक्षाला एक मजबूत पाया दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात भक्कम स्थान निर्माण केले.
आपुलकी आणि स्नेहाचे नेतृत्व
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाचा गाभा म्हणजे, माणसांशी जोडलेले नाते. माणसांच्या हृदयात स्थान निर्माण केल्याशिवाय, तुम्ही त्यांच्या मनावर राज्य करू शकत नाही हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवते. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभाग घेणे, त्यांना आधार देणे आणि त्यांच्या मेहनतीला योग्य दिशा देणे, हा त्यांच्या कामाचा गाभा राहिला आहे.त्यांच्या या वागणुकीने केवळ कार्यकर्तेच नाही, तर सामान्य नागरिकही त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. आपलेपणाची भावना हीच माणसांच्या हृदयाची गुरुकिल्ली आहे, हे ते त्यांच्या प्रत्येक कृतीतून सिद्ध करतात.
संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रवासातून हे स्पष्ट होते की, संघर्ष हीच यशाची खरी गुरूकिल्ली आहे. वाट चुकणार्यांना मार्गदर्शन करता येते. पण, नवी वाट तयार करायची असेल, तर जिद्द लागते. अशा जिद्दीने त्यांनी आपली आणि भाजपच्या ऐतिहासिक विजयाची नवी वाट तयार केली आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासाने आणि कठोर परिश्रमाने, त्यांनी भाजपसाठी एक भक्कम संघटना उभारली आहे. यातून महाराष्ट्र भाजपसाठी पुढचा प्रवास सुकर होणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे केवळ एक नेते नाहीत, तर संघर्ष आणि यशाचा एक दीपस्तंभ आहेत. त्यांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने त्यांनी माणसांना जोडले, त्यांच्याशी विश्वासाचे नाते उभे केले, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा राजकीय प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. त्यांची निष्ठा, परिश्रम आणि नेतृत्वगुणांमुळे त्यांनी महाराष्ट्रातील भाजपला नवीन उंचीवर नेले आहे.
त्यांचे कर्तृत्व असेच बहरत राहो आणि उज्ज्वल महाराष्ट्राची सेवा त्यांच्या हातून घडत राहो, यासाठी त्यांना उदंड आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो याच या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा!
नवनाथ बन
(लेखक महाराष्ट्र भाजपचे प्रदेश माध्यम प्रमुख पदावर कार्यरत आहेत.)