जगातील सर्व मानव विविधता स्वीकारूनही, परस्परांचा आदर आणि सन्मान करीत गुण्यागोविंदाने राहावेत अशी ज्यांच्या मनात प्रामाणिक इच्छा आहे, त्या सर्वांना दि. ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागोच्या १७ दिवस चाललेल्या जागतिक धर्म परिषदेच्या पहिल्या दिवशी स्वामी विवेकानंदांनी केलेले पाच मिनिटांचे भाषण व त्यात त्यांनी मांडलेला दृष्टिकोन स्वीकारावाच लागेल असा आहे. ते उत्स्फूर्त भाषण स्वामी विवेकानंदांच्या मुखातून सर्वांनी ऐकले असले, तरी ते ईश्वरानेच त्यांच्या मुखातून केलेले भाष्य आहे ही वास्तविकता समजून घेतली पाहिजे.
हिंदू समाज, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व हिंदू राष्ट्र याबद्दल अभिमानाची भावना या समाजातून आपण नष्ट करू शकलो तरच येथे राज्य करू शकतो, हे ब्रिटिशांना चांगले समजलेले होते.अनेक शतकांच्या आक्रमणामुळे अंतर्गत मतभेदाने ग्रस्त आणि संकुचित स्वार्थाने पोखरल्या गेलेल्या असंघटित हिंदू समाजाला, शिक्षण पद्धतीद्वारे वृत्तीने इंग्रज बनवण्यामध्ये ब्रिटिशांना मोठे यश प्राप्त झाले. दीडशे वर्षांनंतर स्वराज्य प्राप्त झाल्यानंतरही, स्वातंत्र्याच्या दिशेने आपली वाटचाल मागील दशकातच खर्या अर्थाने सुरू झाली आहे.
जागतिक धर्म संमेलनाची पूर्वतयारी तत्पूर्वी अडीच तीन वर्षांपासून सुरू झालेली होती.संमेलनापूर्वी एक महिना सर्व निमंत्रितांची आणि वक्त्यांची नावे निश्चित झाली होती. त्यामध्ये हिंदू धर्माचा एकही प्रतिनिधी नव्हता. तरीही अगदी अखेरच्या टप्प्यात ईश्वरी इच्छेने अशा काही घटना घडत गेल्या की, वयाने सर्वात लहान असलेल्या स्वामी विवेकानंदांचा स्वीकार त्या संमेलनाने ‘हिंदू धर्माचे प्रतिनिधी’ म्हणून केला. जणू काही सर्वांनी १७ दिवसांच्या संमेलनाचा निष्कर्ष म्हणून, स्वामीजींचे पहिल्या दिवशीचे पाच मिनिटांचे भाषण स्वीकारले.
‘एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ती’ आध्यात्मिकतेतील सनातन धर्मातील, अनुभूतीसंपन्न सर्वोच्च सत्याचा नेमका केलेला विस्तार म्हणजे ते भाषण आहे.व्यष्टी आणि समष्टी यांच्या परिपूर्ण विकासाचे सूत्र तुलनेने खूप सोप्या शब्दात, त्या भाषणात त्यांनी मांडलेले आहे. त्या भाषणातील सत्याची आपण सातत्याने कालोचित उजळणी करीत राहिलो, तरी सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यक ती संघटितशक्ती आणि गुणवत्ता आपल्या राष्ट्रात निश्चित उभी राहू शकते. बीजात वृक्ष लपलेला असावा, त्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांच्या भाषणात समग्र राष्ट्रीय पुनरुत्थान साठविलेले आहे. सर्वांच्या अंतःकरणात आणि मन बुद्धीच्या गाभार्यात, त्यातील आशयाचे चिंतन निनादत राहिले पाहिजे. तमोगुणाचा नाश करण्याचे, सत्त्वगुण प्रतिष्ठित करण्याचे आणि रजोगुणाच्या प्रभावाने, जगासमोर ज्ञानात रत असलेला भारत दोन-तीन दशकात निश्चितच उभा करू शकण्याचे सामर्थ्य, स्वामी विवेकानंदाच्या तपस्वी शब्दात आहे. ‘भारतीय व्याख्याने’ या त्यांच्या पुस्तकात, आपल्या समाजातील दोष आणि विकृतींची मूलगामी चिकित्सा व त्यावर मात करण्याची दिशाही अगदी सुस्पष्टपणे स्वामी विवेकानंद यांनी सांगितली आहे. अनेक श्रेष्ठ सामाजिक सुधारकांनी या संदर्भात खूप चांगले प्रामाणिकपणे काम केले असले, तरी त्यांना तुलनेने खूप कमी यश मिळाल्याचे कारणही स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, “सामान्यतः कोणत्याही समाजसुधारकाने अध्यात्मातील सर्वोच्च अनुभूती प्राप्त करण्यासाठी, पुरेसे प्रयत्न केलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी धर्मालाच दोष दिला. यात धर्माचा कोणताही दोष नसून, धर्म आमच्या राष्ट्र जीवनाचा प्राण आहे. त्या त्या काळात धर्माचा यथोचित अर्थ लावण्यामध्ये त्या त्या काळातील लोक कमी पडले, हे आमच्या पतनाचे मुख्य कारण आहे.”
पाश्चात्य चिंतनाची अवधारणा व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवता यांच्या विकासात अंतर्गत संघर्ष स्वीकारते. त्याच्या मुळाशी, व्यक्ती स्वातंत्र्याचा लावलेला चुकीचा अर्थ हे वास्तविक कारण आहे. “व्यक्तीचा मी कोण आहे? येथून सृष्टी निर्मात्याच्या म्हणजे ईश्वराच्या अनुभूतीपर्यंत होत जाणारा विकास हा स्वाभाविक आणि नैसर्गिक असून, त्यात कोणत्याही स्तरावर अंत:संघर्ष नाही,” असे हिंदू चिंतन आहे. त्यालाच आपल्या येथे ‘सम्यक विकास’ असे म्हणतात. त्यामुळेच स्वामी विवेकानंद हे एकाच वेळी कोणालाही आदर्श वाटावे, असे व्यक्तिमत्त्व होते. ते जसे प्रखर देशभक्त होते, तसेच ते सर्वश्रेष्ठ मानवतावादीही होते. शिशु, बाल, तरुण, प्रौढ आणि वृद्ध यामध्ये विकास असला, तरी अंत:संघर्ष नाही, असेच हे आहे.
‘हितवाद’ या नियतकालिकाचे संपादक सखाराम गणेश देऊसकर हे एका पंजाबी गृहस्थांना घेऊन, १८९७ साली एप्रिलच्या सुमारास विवेकानंदांना भेटावयास आले होते. गृहस्थ पंजाबी होते. त्यावरूनच तेथील सामान्य माणसाच्या दारिद्र्याचा विषय सहजपणे विवेकानंदांच्या बोलण्यात आला. मग त्यासाठी काय करता येईल? यावर बोलण्यातच तास दोन तास सहज गेले. निरोप घेताना ते पंजाबी गृहस्थ म्हणाले, “आपली दिगंत कीर्ती आणि अधिकार ऐकून, काही आध्यात्मिक विचार ऐकावेत म्हणून मोठ्या अपेक्षेने आलो होतो. पण, आजचा संपूर्ण वेळ साधारण गोष्टी बोलण्यात वाया गेला.” त्यांच्या मनात उमटलेला खेद विवेकानंदांच्या ध्यानात आला. विवेकानंदांनी उत्तर देताना म्हटले, “महाशय, जोवर माझ्या देशात एक कुत्रादेखील अन्नाविना उपाशी आहे, तोवर त्याची चिंता वाहणे हाच माझा धर्म आहे. बाकीचा सारा धर्मविचार एकतर खोटा आहे किंवा चुकीचा आहे.” हे उद्गार ऐकल्यावर, विवेकानंदांच्या हृदयातील देश बांधवाविषयीची करुणा किती गाढ आहे, (जी भगवान बुद्ध देवांच्या उंचीचीच आहे) याची आपल्याला कधीही विसरता न येणारी प्रचिती आली आणि खर्या देशभक्तीचे स्वरूप काय असते, ते आपल्याला उमजले, असे कित्येक वर्षांनंतर ही आठवण सांगताना देऊस्करांनी म्हटले आहे.
जगातील अनेक संप्रदायांनी ‘ईश्वर एकच आहे,’ हा विचार मान्य केला आहे. तथापि, आम्ही म्हणतो तोच ईश्वर खरा आहे आणि इतरांचे ईश्वर खोटे आहेत, ही एकच बाब खरे म्हणजे त्यांना ईश्वराची अनुभूती आली नसल्याचा पुरावा आहे. भारतातील अनेक संप्रदाय आणि त्याचे प्रवर्तक सर्वोच्च सत्याच्या प्राप्तीसाठी विशिष्ट मार्गाचा स्वीकार करीत असले, तरी अन्य मार्ग चुकीचे आहेत असे म्हणत नाहीत. ‘इन्फिनिटी’ ही गणितातील संकल्पना जशी वेगवेगळी असू शकत नाही. दोन ‘इन्फिनिटी’ असूच शकत नाहीत. त्याचप्रमाणे, ‘ईश्वर’ ही संकल्पना जे त्या अनुभूतीपर्यंत पोहोचले आहेत, त्यांना ती एकच आहे हे समजते. ती शक्ती सर्व शक्तिमान असल्याने, त्याच्या इच्छेनुसार सूक्ष्म अथवा अनंत रूपात प्रकटही होऊ शकते. अणुरेणू या संत वचनात हेेच सांगितलेले आहे. हिंदू धर्म हा अभ्युदय नाकारत नाही. त्यातून इंद्रिय सुख प्राप्त होत असले, तरी ते अंतिम नसल्याने त्यात गुंतून पडू नये असे सांगतो. त्याचवेळी निश्रेयस हे अंतिम सत्य आहे, हेही ध्यानात आणून देतो.
संपूर्ण मानव जीवन सुखाचे व्हावयाचे असेल, तर चार पुरुषार्थ आणि चार आश्रम यांच्या आधारानेच, व्यक्तीचे जीवन संस्कारित करण्याची रचना भारताने उभी करावयास हवी. या रचनेतूनच सर्व प्रश्नांचे समाधान होऊ शकते, याचा नमुना जगासमोर प्रस्थापित करावयास हवा. तो पाहून जगानेही त्यांच्या हितासाठी, या मार्गांचे अनुसरण करावे. याचाच अर्थ भारतमाता जगाच्या गुरूस्थानी विराजमान झाली आहे असा होतो. त्याचा मार्ग भारतातील तरुण तरुणींनी, अंतिम सत्याचा साक्षात्कार करण्याच्या साधनेबरोबरच ‘शिव भावाने जीव सेवा’ या मार्गाने, आपले संपूर्ण जीवन समर्पित करण्यानेच प्रशस्त होतो. यासाठी भारतभूमीचा कणकण पवित्र आहे ही अनुभूती येण्यासाठी, या साक्षातकारातूनच ही प्रेरणा लाभू शकेल.
त्या दिशेने पुढे जाण्यासाठी, शिकागो येथील स्वामी विवेकानंदांचे पाच भाषण पाठ करणे, ते भाषण स्वहस्ते लिहून काढणे व वेगवेगळ्या संघटनांनी ते भाषण कालचित समजून देणारे व्याख्यान आयोजित करणे, या माध्यमातून हा विषय सहजपणे उमलत जाऊ शकतो, असे वाटते.
जयंत रानडे
(लेखक प्रांत मंडळ सदस्य पश्चिम महाराष्ट्र प्रांत कुटुंब प्रबोधन गतिविधी आहेत.)
९८२२८६१६८४