मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Vivek Agnihotri Oxford Union) काश्मीर फाइल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या सोशलमिडिया प्लॅटफॉर्मवरून 'ऑक्सफर्ड युनियन'चे आमंत्रण नाकारल्याचे सांगितले आहे. इंग्लंडच्या या ऑक्सफर्डने त्यांना एका वादविवादाच्या चर्चासत्रात काश्मीरच्या स्वातंत्र्यावर बोलण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र हा कार्यक्रम भारत आणि काश्मीरविरोधी भूमिका घेत असून अशा वादविवादांचे आयोजन करणे म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान असल्याचे विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे. निमंत्रण नाकारण्याबाबत त्यांनी एक पत्रही लिहिले आहे.
अग्निहोत्री यांनी ऑक्सफर्ड युनियनला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केवळ १४० कोटी भारतीयांसाठीच नाही तर १९९० च्या काश्मीर नरसंहारात लाखो विस्थापित हिंदू पीडितांसाठी मला हे केवळ अप्रियच नाही तर अपमानास्पदही वाटते. जोपर्यंत इस्लामिक दहशतवाद्यांच्या धमक्यांमुळे मातृभूमीतून विस्थापित झालेले काश्मिरी हिंदू परत येत नाहीत तोपर्यंत काश्मीरच्या सार्वभौमत्वावर कोणताही वादविवाद होऊ शकत नाही.
ऑक्सफर्ड युनियन सोसायटीने विवेक अग्निहोत्री यांना 'या सभागृहाचा स्वतंत्र काश्मीर राज्यावर विश्वास आहे' या शीर्षकाच्या चर्चेवर बोलण्यासाठी आमंत्रित केले होते. वादविवादासाठी दि. २४ ऑक्टोबर ते ५ डिसेंबर पर्यंतच्या काही तारखाही विचारण्यात आल्या होत्या. कोणत्या दिवशी येण्यास सोयीस्कर वाटेल असे विचारण्यातही आले होते. परंतु अग्निहोत्री यांनी या वादविवादात सहभागी होण्यास नकार दिला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या वादविवासाठी ऑक्सफर्ड युनियनचे अध्यक्ष इब्राहिम उस्मान मोफी यांनी ब्रिटीश खारदार नाझ शाह, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनादेखील वादविवादासाठी निमंत्रिक केले आहे.