मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील आणखी एक सदस्य २२ सप्टेंबर २०२४ च्या आठवड्यात घराबाहेर गेला. तो सदस्य म्हणजे अरबाज पटेल. घरात सर्वाधिक ज्या दोन सदस्यांची चर्चा झाली ते म्हणजे निक्की तंबोळी आणि अरबाज पटेल. पण गेल्या काही दिवसांमधील त्यांचं वागणं आणि बऱ्याच इतर गोष्टींमुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी अरबाज आणि परिणामी निक्कीला चांगलाच धक्का दिला आहे. महाराष्ट्रातील जनतेची सर्वात कमी मतं मिळाल्याने त्याला ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे.
गेल्या आठवड्यात
‘बिग बॉस’च्या घरात ‘जंगलराज’ ही थीम होती. या ‘जंगलराज’ थीममध्ये ‘शिकाऱ्याची बंदूक’ हे नॉमिनेशन कार्य पार पडलं होतं. या कार्यात अरबाज, जान्हवी, वर्षा, निक्की, सूरज असे पाच सदस्य घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. यांच्यामध्ये सर्वात कमी मतं मिळाल्यामुळे अरबाजला ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घ्यावी लागली आहे. दरम्यान, अरबाज एलिमिनेट झाल्याचं जाहीर होताच निक्की ढसाढसा रडू लागल्याचं पाहायला मिळालं.
मागच्या आठवड्यात ‘भाऊच्या धक्का’ नसल्याने एलिमिनेशनसाठी ‘बिग बॉस’च्या टीमने सर्व सदस्यांना अॅक्टिव्हिटी रुममध्ये बोलावलं होतं. प्रत्येकाचं नाव लिहिलेल्या बॅगांमध्ये ते सदस्य सेफ आहेत की डेंजर झोनमध्ये याच्या पाट्या ठेवण्यात आल्या होत्या. जान्हवी, सूरज आणि वर्षा हे तिघेही सेफ होऊन शेवटी डेंजर झोनमध्ये निक्की आणि अरबाज राहिले होते. यावेळी ‘बिग बॉस’कडून अरबाज एलिमिनेट झाल्याचं सांगण्यात आलं आणि निक्की घरात प्रचंड रडू लागली.
विशेष म्हणजे बिग बॉस मराठीच्या इतिहासत पहिल्यांदाच घरात कॅप्टन झालेला सदस्य पहिल्यांदाच एलिमिनेट झाल्याची घटना घडली आहे. अरबाज पटेलला आठव्या आठवड्यात पुन्हा एकदा घराचा कॅप्टन होण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे “अरबाज घराबाहेर झाल्यास ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील पहिला कॅप्टन असलेला सदस्य आहे जो घराबाहेर गेला आहे आणि तसं बिग बॉसने आधीच स्पष्ट केलं होतं.
त्यामुळे आता अरबाज घरातून बाहेर गेल्यामुळे निक्कीला घरात कोण आधार देणार, ती इथून पुढचा खेळ कसा खेळणार या सगळ्या गोष्टींकडे संपूर्ण महाराष्ट्रॉचं लक्ष लागलं आहे. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’चा सीझन नेमका केव्हा संपणार हे सुद्धा लवकरट स्पष्ट होण्याची शक्यता आहे.