मुंबई : जगातील मानाचा समजला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार २०२५ च्या नामांकनात किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. तब्बल २९ चित्रपटांमधून ‘लापता लेडिज’ हा चित्रपट ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवला आहे.
९७ वा अकादमी पुरस्कार अर्थात ‘ऑस्कर २०२५’ साठी भारताकडून ‘लापता लेडीज’ची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय (विदेशी) चित्रपट श्रेणीत ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला भारताकडून नामांकन मिळाले आहे. यासंदर्भात ‘द फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या सदस्यांनी ऑस्कर २०२५ साठी भारताच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा केली आहे.
यंदा फिल्म फेडरेशनकडून ‘लापता लेडीज’सह एकूण २९ चित्रपट पाठवण्यात आले होते. यात अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’, कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’, प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’, मल्याळम चित्रपट ‘आट्टम’, राजकुमार रावचा ‘श्रीकांत’, कान्स फेस्टिव्हलमध्ये बाजी मारणाऱ्या ‘ऑल वी इमेजिन ॲज लाइट’ अशा २९ चित्रपटांची यादी होती. ज्यातून किरण राव दिग्दर्शितआणि आमिर खानच्या प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘लापता लेडीज’ने यात बाजी मारली आहे. १ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला अगदी चित्रपट समीक्षकांपासून ते प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. चित्रपटगृहात असताना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई न करणाऱ्या या चित्रपटाने मात्र ओटीटीवर तुफान प्रतिसाद मिळवला आणि परिणामी थेट ऑस्कर गाठला.
आसामी दिग्दर्शक जाह्नू बरुआ यांच्या अध्यक्षतेखालील निवड केलेल्या १३ सदस्यांच्या समितीने एकमताने किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’चा अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ( विदेशी ) चित्रपट श्रेणीत समावेश करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, ऑस्करसाठी नामांकन मिळाल्यानंतर दिग्दर्शिका किरण राव यांनी आपला आनंद व्यक्त करताना म्हटले की, “आमचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडला गेला याचा मला खूप आनंद होत आहे. माझ्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमामुळे आज हे यश आम्हाला मिळालं आहे. मला आशा आहे की, हा चित्रपट भारताप्रमाणेच जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.” त्यामुळे नामांकनानंतर आता ऑस्कर पुरस्कार मिळावा अशीही इच्छा व्यक्त केली जात आहे.