मुंबई : भारत विरुध्द बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू असून पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशवर मोठा विजय प्राप्त केला आहे. दरम्यान, चेन्नई येथील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने २८० धावांनी विजय मिळविला आहे. पहिल्या डावात आर. आश्विन तर दुसऱ्या डावात शुभमन गिलने शतकी खेळी केली.
या सामन्यात बांगलादेशने प्रथम नाणेफेक जिंकत टीम इंडियाला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. पहिल्या डावात भारताने सर्व बाद ३७६ धावा केल्या. तर बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर आटोपला. यासह भारताला दुसऱ्या डावाकरिता २२७ धावांची बहुमुल्य आघाडी मिळविता आली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ४ बाद २८७ धावांवर आपला डाव घोषित केला.
या सामन्यात बांगलादेशला विजयाकरिता टीम इंडियाने ५१४ धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला केवळ २३४ धावाचं करता आल्या. भारताकडून गोलंदाजी करताना आर. आश्विनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह टीम इंडियाने बांगलादेशवर २८० धावांनी विजय मिळविला.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पुढील दुसरा कसोटी सामना दि. २७ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर या कालावधीत कानपूर येथे खेळविण्यात येणार आहे. पुढील सामन्यात विशेष कामगिरी करत सामन्यात विजय मिळवून मालिका विजय प्राप्त करण्याची संधी टीम इंडियाला असणार आहे. आताचा फॉर्म राखत बांगलादेशला क्लीन स्वीप देण्याची नामी संधी भारताला असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईँट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे.