आवक घटल्याने लसूण, कोथिंबीर खातेय भाव

किरकोळ बाजारात दर ४०० रुपयांच्या पुढे; पाऊस पडल्यास दर वाढण्याची शक्यता

    21-Sep-2024
Total Views |

CORIENDER
 
नाशिक, दि. २० : फोडणीची चव वाढवणारा लसूण (Garlic)आणि भाजीला स्वाद आणणारी कोथिंबीर (Coriender)या दोघांचेही दर कमालीचे वधारल्याने खाणार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कोणतीही भाजी बनवताना तिला चव यावी म्हणून लसणाचा तडका दिला जातो. तर कोथिंबिरीशिवायदेखील स्वयंपाकाला पूर्णत्व येत नाही. मात्र, दर चांगलेच वधारल्याने एकीकडे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असला, तरीही मध्यमवर्गीयांचे गणित मात्र बिघडले.
 
मागील महिनाभरापासून दर वाढण्यास सुरुवात झाली असून, पावसाने पुढील काही दिवसांत हजेरी लावल्यास त्यात अजून वाढ होणार असल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगितले जात आहे. शेतकरीवर्गाचा नेहमीच द्राक्ष, टोमॅटो, कांदा, डाळिंब ही नगदी पिके घेण्याकडे कल राहिला आहे. आळीपाळीने याच पिकांना शेतकर्‍यांची पसंती असते. त्यामुळे लसूण, आले, मेथी आणि कोथिंबीर ही पिके घेण्याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले जात नाही. त्यामुळेच बाजारात या पिकांचे दर नेहमीच वाढलेले दिसून येतात. त्यातच अतिपावसाने शेतात उभ्या असलेल्या पिकांची नासाडी केली. या काळात बरीच पिके खराब झाली. त्यात कोथिंबिरीचे पीक खूपच नाजूक असल्याने पावसाचे टपोरे थेंब आणि चिखलामुळे ती शेतातच पिवळी पडली. तर पाणी तुंबल्याने लसूण खराब झाला. याचा प्रतिकूल परिणाम होऊन बाजारात होणारी आवक मोठ्या प्रमाणावर घटली. सद्यस्थितीत ‘नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती’मध्ये लसणाची फक्त ६४ क्विंटल, तर कोथिंबिरीची १६५ क्विंटल आवक झाली. त्यामुळे लसणाला कमाल ३२ हजार, तर सरासरी २४ हजार ५०० आणि कोथिंबिरीला कमाल २५ हजार, तर सरासरी १६ हजार रुपये इतका दर मिळाला. घाऊक बाजारामध्येच जवळपास लसूण ३२०, तर कोथिंबीर २५० रुपयांना विकली गेली. त्यामुळे किरकोळ बाजारातदेखील लसूण आणि कोथिंबीर भाव खात असून किलोला ४०० ते ४५० दराने विकली जात आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जर हा पाऊस बरसला तर सध्या सुरू असलेली आवक अजूनही बर्‍याच मोठ्या प्रमाणात खालावण्याची शक्यता असून दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
 
सर्वच भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यात पितृपक्ष सुरू असल्याने नैवेद्यासाठी लागणार्‍या भाज्या मिळतील त्या दरामध्ये खरेदी कराव्या लागत आहेत. लसूण आणि कोथिंबिरीबाबत न बोललेलेच बरे. यांचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.
 
- शितल पवार, गृहिणी, नाशिक
 
श्रावण महिन्यापासून विविध प्रकारच्या भाजीपाल्याला मागणी वाढते. तसेच पावसाळ्याच्या दिवसात दरवाढ होत असते. परंतु, सद्यस्थितीत आवक घटल्याने घाऊक बाजारात दरवाढ झाल्याने याचा परिणाम किरकोळ बाजारावरही झाला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनाही दरवाढ करावी लागते.
 
- गणपत वाघ, किरकोळ विक्रेता, दिंडोरी