देवेंद्र फडणवीस मराठी माणसांचे तारणहार : प्रवीण दरेकर
21-Sep-2024
Total Views |
सुहास शेलार , मुंबई, दि. २० : (Pravin Darekar) गेल्या २४ वर्षांपासून पुनर्विकासासाठी संघर्ष करणार्या अभ्युदय नगरवासीयांना अखेर न्याय मिळाला आहे. अभ्युदय नगर ‘म्हाडा’ वसाहतींच्या पुनर्विकास जलदगतीने पूर्ण करताना, ६३५ चौ. फुटांचे घर देण्याचा क्रांतिकारी निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच घेतला. १५ हजार मराठी कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. हा प्रश्न तडीस नेण्यासाठी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. त्यानिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ने दरेकर यांच्याशी साधलेला संवाद.
अभ्युदय नगरच्या पुनर्विकासासंदर्भात नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी बैठक झाली. तुम्ही शिष्टमंडळासह या बैठकीला उपस्थित होता. बैठकीत नेमके काय घडले?
मुंबईच्या हाऊसिंग सेक्टरमधील क्रांतिकारी निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत घेतला. अभ्युदय नगरचा पुनर्विकास गेल्या २४ वर्षांपासून रखडलेला होता. मध्यमवर्गीय मराठी माणूस, कामगारवर्ग येथे राहत असल्यामुळे हा आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय होता. आम्ही गोरेगाव येथे गृहनिर्माण संस्थांची परिषद घेतली. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अभ्युदय नगरवासीयांना आश्वासित केले होते. ‘म्हाडा’च्या पातळीवर यासंदर्भात अनेक बैठका झाल्या. त्यात ५०० चौ. फुटांचे घर देण्याचा विषय चर्चेला आला होता. त्यामुळे रहिवासी संभ्रमित झाले होते. पण, देवेंद्र यांनी तत्काळ बैठक लावून तोडगा काढला. २०८ चौ. फुटांच्या घरांमध्ये राहणार्या अभ्युदय नगरवासीयांना आता किमान ६३५ चौ. फुटांचे घर मिळणार आहे. सुरुवातीच्या प्रस्तावात चार घरांमागे एक पार्किंग देण्याची योजना होती. परंतु, देवेंद्र यांनी भविष्यकाळाचा विचार करून एका घरामागे एक पार्किंग देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.
गेल्या २५ वर्षांपासून अभ्युदय नगरचा पुनर्विकास रखडल्याचे तुम्ही म्हणालात. त्यामागची नेमकी कारणे काय आहेत? आणि फडणवीसांनी त्यातून मार्ग कसा काढला?
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजवटीत अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडला. मधल्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा प्रस्ताव शासनाकडे आला होता.
अडीच वर्षांत उद्धव यांनी त्या फाईलला स्पर्शदेखील केला नाही. ज्या मराठी माणसांच्या जीवावर त्यांची इतकी मोठी संघटना उभी राहिली, त्यांच्यासाठी ठाकरेंनी निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. जेव्हा हा विषय आम्ही देवेंद्र फडणवीस यांना सांगितला, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तो मार्गी लावला. आमचे सरकार केवळ घोषणा करीत नाही, तर गतीने काम करते.
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यात फडणवीसांची प्रमुख भूमिका राहिली आहे. आता अभ्युदय नगरच्या पुनर्विकासात देवेंद्र तशाच भूमिकेत दिसत आहेत का? असतील तर ते कसे?
नेत्याकडे इच्छाशक्ती, व्हिजन आणि अभ्यास असायला हवा. देवेंद्र यांकडे या तिन्ही गोष्टी आहेत. अभ्युदय नगरचे उदाहरण घ्यायचे झाल्यास, घर मोठे देऊ, पण ते कसे, हे अधिकार्यांना गणितासहित पटवून द्यायला हवे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखायला हवा. ती क्षमता माझ्या नेत्यामध्ये आहे. वरळी बीडीडी चाळीचा प्रश्न त्यांच्याच पुढाकाराने मार्गी लागला. आज मुंबईतील दुसरा मोठा प्रकल्प अभ्युदय नगरच्या रुपाने मार्गी लागला आहे. तब्बल ६३५ चौ. फुटांचे घर देण्याचा निर्णय क्रांतिकारी आणि ऐतिहासिक आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मराठी माणसाचे तारणहार असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.
शिवडी, लालबाग, परळ हा कोअर मराठी मतदार असलेला भाग. असे असतानादेखील गेली अनेक वर्षे इथल्या मराठी माणसांचे प्रश्न सुटलेले नाही. विशेषतः घरांचे. अशावेळी सत्ताधारी पक्ष म्हणून भाजप या प्रश्नांवर मार्ग कसा काढत आहे?
केवळ शिवडीच नव्हे, तर संपूर्ण मुंबईतील मराठी माणसांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे सरकार काम करीत आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे मुंबईला नवा आयाम प्राप्त झाला आहे. वरळी, शिवडी, लालबागसारखे मध्यमवर्गीय मराठी माणसांचे विभाग केंद्रित करून योजना आखल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे महायुती म्हणून मराठी माणसांच्या विकासासाठी झटत आहेत. गिरणगावाला विकासाच्या बाबतीत प्राधान्य देण्याची सरकारची भूमिका आहे.