गर्दी टाळण्यासाठी मुंबईत १० हजार १११ मतदान केंद्रे
निवडणूक आयोगाचा निर्णय; प्रत्येक केंद्रावर सरासरी १ हजार २०० मतदार
20-Sep-2024
Total Views |
मुंबई : (Election Commission )लोकसभा निवडणुकीच्या मतदानप्रक्रियेवेळी मुंबईतील काही मतदान केंद्रावर गर्दी झाल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले होते. त्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरात २१८ अतिरिक्त केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ इतकी होईल.
आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, यासाठी मुंबईतील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार, प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी पूर्वी असणारी सरासरी १ हजार ५०० मतदारांची संख्या ही आता सरासरी १ हजार २०० पर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाचे प्रमाण आणि वेग वाढण्यास मदत होणार आहे.
सुसूत्रीकरण केल्याने मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये झालेल्या नवीन बदलांसंदर्भात मतदारांना माहिती देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ म्हणजेच ‘Know Your Polling Station’ ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये झालेल्या बदलांची माहिती देतील. याशिवाय, नोंदणीकृत मतदारांना लेखी पत्राद्वारे तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही माहिती देण्यात येईल.