मुंबई : अभिनेता सलमान खान याला गेल्या काही महिन्यांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. इतकेच नव्हे तर त्याच्या बांद्रा येथील गॅलेक्सी घरावर गोळीबार देखील करण्यात आला होता. या प्रकरणावर दरदिवशी नवी अपडेट येत असताना आज १९ सप्टेंबर २०२४ रोजी पुन्हा एकदा खान कुटुंबाला धमकी देण्यात आली आहे. सलमान खानचे वडिल सलीम खान पहाटे चालायला गेले असता एका बुरखाधारी महिलेने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सलीम यांना धमकी दिली आहे.
तर झाले असे की, सलीम खान वांद्रे येथे असलेल्या त्यांच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमधून पहाटे मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. त्याचवेळी एका बाईकस्वाराने त्यांचा रस्ता अडवला. त्यांपैकी एक महिला होती आणि तिने बुरखा घातला होता. त्या महिलेने सलीम खान यांना अडवून "लॉरेन्स बिश्नोईला पाठवू काय?" असं विचारलं आणि ते सुसाट पळून गेले. त्यामुळे आता सलीम खान यांना रस्त्यात अडवून खान कुटुंबाला धमकी मिळाल्यामुळे खळबळ माजली आहे.
दरम्यान, ई टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या बाईकस्वार आणि बुरखाधारी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. CCTV फूटेजच्या माध्यमातून पोलीसांना या दोघांचा शोध घेण्यात यश मिळाले. पोलिसांनी याबद्दल माहिती देताना म्हटले की, "या दोघांनी सलीम खान यांच्याशी फक्त मस्ती केली होता. आम्ही त्यांना अटक केली असून त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे,” असे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे.