"ज्यांनी मोदींसाठी ११०हून जास्त वेळा अर्वाच्च भाषा वापरली ते हिंसक वक्तव्य रोखण्याची भाषा करतायतं!"
राहुल गांधी फेल प्रोडक्ट म्हणत जे.पी.नड्डांनी दाखवला खरगेंना आरसा
19-Sep-2024
Total Views | 57
नवी दिल्ली : "जनतेने वारंवार नाकारलेलं 'फेल प्रोडक्ट' वारंवार पॉलीश करून बाजारात उतरवण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान नरेंद्र मोदींना जे पत्र लिहीलं आहे. त्या पत्राला वाचून मला असं जाणवलं की त्यापासून सत्य हे कित्येक मैल दूर आहे. यावरुन एक गोष्ट तर लक्षात येतेच की राहुल गांधींची नेता म्हणून असलेल्या करामती आपण डोळेझाक करत आहात किंवा विसरला तरी आहात. त्यामुळेच याच गोष्टींची आठवण करून देण्यासाठी मी या मुद्द्यांना हात घालत आहे.", भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंना पत्र लिहून त्यांना चोख प्रत्युत्तर देत काँग्रेसच्या आजवरच्या करामतींची आठवण करून दिली आहे.
जे.पी.नड्डा म्हणाले, "तुम्ही ज्या प्रकारे 'सिलेक्टीव्ह' होऊन केवळ राहुल गांधींची गोष्ट केली. त्यामुळे त्यांच्यापासूनच या पत्राची सुरुवात करेन. ज्या व्यक्तीचा इतिहासच देशाच्या पंतप्रधानांसहीत संपूर्ण ओबीसींना चोर आणि शिवीगाळ करण्याचा आहे, देशाच्या पंतप्रधानांना वारंवार अवमानित करण्याचा आहे, ज्याने देशाच्या पतंप्रधानांना लाठ्याकाठ्यांनी मारण्याची भाषा केली होती, ज्या व्यक्तीची अविचारी वृत्ती संपूर्ण देशाला माहिती आहे, त्या राहुल गांधींची बाजू घेण्याचा केविलवाणा प्रयत्न तुम्ही करत का आहात? राहुल गांधींच्या मातोश्रींना नरेंद्र मोदींना 'मौत का सौदागर', अशी उपमा दिली होती. त्यावेळी तुमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते याचे ढोल बडवत राहिले. तुम्ही अध्यक्ष म्हणून आत्मचिंतन केलेच पाहिजे."
नड्डा आपल्या पत्रात म्हणतात की, "मागच्या १० वर्षात, काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यावर ११० हून जास्त वेळा अर्वाच्य भाषेत टीका केली, ज्यात दुर्देवाने काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांचा सुद्धा समावेश आहे. एका बाजूला राहुल गांधींवर होणाऱ्या टीकेने ज्यांना त्रास होतो ते स्वत: मात्र, राजकीय मर्यादा विसरत मोदींवर टिका करत होते." असं म्हणत नड्डांनी काँग्रेसचे दुटप्पी धोरण उघडकीस आणले आहे.
राहुल गांधींचा अभिमान कसला बाळगता?
काँग्रेस पक्षाला राहुल गांधींचा अभिमान का वाटतो असा प्रश्न नड्डा यांनी केला. "काँग्रेसला राहुल गांधींचा अभिमान का वाटतो ? दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ असलेल्या कार्यक्रमाला ते हजेरी लावतात म्हणून? की कलम ३७० पुन्हा लागू करावा असे म्हणतात म्हणून? सनातन धर्मावर वारंवार टीका करतात म्हणून? की हिंदू समाज हा पाकीस्तानी संघटनांपेक्षा त्यांना मोठा धोका वाटतो म्हणून?", आणीबाणी घोषित करुन, तिहेरी तलाकला सर्मथन देऊन, लोकशाहीची खरी बदनामी काँग्रेसनेच केल्याच दावा जे.पी.नड्डा यांनी केला आहे.
"राहुल गांधींसारखा नेता विदेशात जाऊन आरक्षण संपविण्याची भाषा करतो, दलित, आदिवासी, मागासवर्गीयांचा हक्क हिरावण्याची भाषा करत असतो. जम्मू काश्मीरमध्ये प्रस्थिपित होत असलेली शांतता त्यांच्या डोळ्यात खुपते म्हणूनच कलम ३७० पुन्हा लागू करण्याची भाषा ते करतात. वीर जवानांच्या हौतात्म्यालाही ते "खून की दलाली" हे नाव देतात. शीखांच्या पोशाखाबद्दलही राहुल गांधी वादग्रस्त टीपण्णी करतात. त्यामुळे आपले पत्र हे स्वतःच्याच दुटप्पीपणाची पोलखोल करत नाही का?", असेही जे.पी.नड्डा म्हणाले.
"राहुल गांधी कमी म्हणून की काय तुमच्याच पक्षातील सॅम पित्रोदा पासून इमरान मसूद पर्यंत, के सुकेश पासून दिग्विजय सिंहांपर्यंत, शशी थरूर पासून पी. चिदंबरम पर्यंत या सर्वांनीच देशाला अवमानित करण्यासाठी काय काय नाही केलं? एका समाजला दुसऱ्यांविरोधात भडकवण्याशिवाय काँग्रेस करतं काय? तुमच्याच नेत्यांच्या कार्यक्रमाला जेव्हा 'पाकिस्तान जिंदाबाद', अशा घोषणा दिल्या जातात, तेव्हा तुम्हाला पत्र लिहीण्याची सुबुद्धी का नाही सुचली? देव आपल्याला सदबुद्धी देवो", अशा शब्दांत त्यांनी खरगेंना खडेबोल सुनावले आहेत.