ठाण्यात प्रधानमंत्री आवास योजनेला गती

दुसऱ्या टप्यातील ७ हजार १४१ उद्दिष्टांपैकी ३ हजार ५५६ लाभार्थींना मंजुरी

    19-Sep-2024
Total Views |
 
PMAY
 
ठाणे, दि.१८ : प्रतिनिधी : (PMAY) गोरगरीबांचे मालकीच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेला गती मिळाली आहे. या योजनेच्या ग्रामीण टप्पा एक व टप्पा दोन अंतर्गत गृहप्रवेश चावी वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. दुसऱ्या टप्यातील ७ हजार १४१ उद्दिष्टांपैकी ३ हजार ५५६ लाभार्थींना मंजुरी देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
 
देशातील प्रत्येक गरीब माणसाच्या मालकीचे घर असावे, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या योजनेची अंमलबजावणी शहरी व ग्रामीण भागात होत आहे. प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२४-२५ मधील मंजूर लाभार्थ्यांना मंजूरी पत्रांचे तसेच १४ लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात घरकुल मंजूर पत्रकाचे वितरण जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री आवास योजना टप्पा एक अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल दोन लाभार्थ्यांना आणि शहरी भागातील तीन लाभार्थीला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते घरांची चावी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत २०२४-२५ करिता ७ हजार १४१ उद्दिष्ट प्राप्त झाले आहे त्यापैकी सद्यस्थितीला ३ हजार ५५६ लाभार्थींना मंजुरी देण्यात आली असून २ हजार ६०१ पहिला हप्ता वितरण करण्यासाठी एफटीओ जनरेट करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी प्रास्तविकात दिली.‌