शहरातील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये लागणार सोलार पॉवर युनिट; मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून योजनेला प्रारंभ
19-Sep-2024
Total Views |
डोंबिवली, दि.१८ : प्रतिनिधी : (Green Energy City)डोंबिवलीतील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये आता सोलार पॉवर युनिटद्वारे वीजनिर्मिती केली जाणार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही अभिनव योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १४ गृहसंकुलांना सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या हस्ते सोलार पॅनलवाटप करण्यात आले. त्यामुळे आता राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी बिरूदावली मिळविलेल्या डोंबिवली शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या हस्ते सोलार पॅनल वाटप करण्यात आले. हाऊसिंग सोसायट्यांमधील सार्वजनिक वापराच्या विजेचे येणारे जास्त बिल, या बिलात सातत्याने होणारी वाढ, या दरवाढीचा सोसायटी देखभालीच्या दरावर होणारा प्रतिकूल परिणाम आदी प्रमुख समस्यांना सोसायटी पदाधिकाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर काय उपाय करता येईल का यादृष्टीने डोंबिवलीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मोफत सोलार पॉवर युनिट बसविण्याची योजना बऱ्याच वर्षांपासून आपल्या मनात असल्याचे सार्वजनिकबांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. यावेळी समीर चिटणीस, शशिकांत कांबळे, साई शेलार, राजू शेख आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
या योजनेसाठी सोलार पॉवर कंपन्या, सोसायट्या आणि 'महावितरण' कंपनी यांना एकाच व्यासपीठावर आणत काही दिवसांपूर्वी ५४ सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी 'लेटर ऑफ इंटेंट' साईन केले आहे. हा एकप्रकारे डोंबिवली शहराला 'ग्रीन एनर्जी सिटी' करण्याच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणारा प्रकल्प आहे. विशेष म्हणजे या योजनेत सोलार पॉवर युनिटच्या फिंटींग आणि देखभालीसह संपूर्ण प्रक्रिया ही मोफत पार पडणार आहे. यामुळे सोसायट्यांना सोलार पॉवर युनिट बसवणो आणि त्याची देखभाल करण्यासाठी सोसायटीचे फंड्स वापरावे लागणार नसल्याचे ही चव्हाण यांनी सांगितले.
हजारो सोसायट्या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक
केंद्र सरकारच्या 'अक्षय ऊर्जा स्त्रोत योजने'चा प्रसार करताना रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत गृहनिर्माण सोसायटयांना मोफत सोलार युनिट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालवला आहे. हजारो सोसायट्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असून या माध्यमातून सोलार एनर्जीचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार होणार आहे.
पुढील २५ वर्षे स्थिर वीजदर शक्य होणार
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात अनेक सोसायट्या जोडल्या गेल्या आहेत. आजपर्यंत एकूण २६८ गृहसंकुल लाभार्थी झाले आहेत. या योजनेमुळे सोलार पॉवरच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीला स्वत:ची वीजनिर्मिती करता येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वापराच्या जोडणीसाठी पुढील २५ वर्षे स्थिर वीजदर शक्य होणार आहे.