अभ्युदयनगरवासीयांना मिळणार ६३५ चौ. फुटांचे घर

देवेंद्र फडणवीसांचा क्रांतिकारी निर्णय; प्रवीण दरेकरांच्या पुढाकारामुळे २५ वर्षांनी मिळाला न्याय

    19-Sep-2024
Total Views | 23
 
Abhyudaya Nagar
 
मुंबई, दि. १८ : (Abhyudaya Nagar) गेल्या २५ वर्षांपासून पुनर्विकासासाठी संघर्ष करणार्‍या अभ्युदयनगरवासीयांना अखेर न्याय मिळाला आहे. अभ्युदयनगर ‘म्हाडा’ वसाहतींच्या पुनर्विकासाची निविदाप्रक्रिया गतिमानतेने पूर्ण करताना आणि ६३५ चौ. फुटांचे घर देण्याचा क्रांतिकारी निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. १८ सप्टेंबर रोजी घेतला. भाजपचे विधान परिषदेतील गटनेते यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. या निर्णयाचा अभ्युदयनगर वसाहतीतील १५ हजार मराठी, मध्यमवर्गीय आणि कामगारवर्गाला फायदा होणार आहे.
 
अभ्युदयनगर ‘म्हाडा’ वसाहतीच्या पुनर्विकासासंदर्भात प्रवीण दरेकर यांनी निवेदन दिले होते. त्यानुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सह्याद्री राज्य अतिथीगृहावर बैठक घेतली. त्यावेळी उपरोक्त निर्देश देण्यात आले. या बैठकीला गृहनिर्माणमंत्री अतुल सावे (दूरदृष्यप्रालीद्वारे), आ. प्रसाद लाड, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी मिलींद बोरीकर, उपसचिव अजित कवडे, अवर सचिव अरविंद शेटे, अभ्युदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार काटकर, उपाध्यक्ष विलास सावंत, तुकाराम रासम, केतन चव्हाण यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
 
या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पातील रहिवाशांच्या मागण्या जाणून घेतल्या. अभ्युदयनगर ‘म्हाडा’ वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाची निविदा काढताना त्यामध्ये सदनिकेचे क्षेत्रफळ हे ६३५ चौरस फुटांपेक्षा जास्त असावे, भविष्याच्यादृष्टीने सदनिकाधारकाला चारचाकी वाहनासाठी पार्किंग असावी, सदनिकेची किंमत खुल्या बाजारभावानुसार असावी अशा अटी समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या उच्चाधिकार समितीची मान्यता घेऊन पुनर्विकास प्रकल्पाची निविदा लवकरात लवकर काढा, असे निर्देश त्यांनी दिले.
 
प्रत्येकाला मिळणार कार पार्किंग
 
“प्रत्येकाला कार पार्किंग मिळाले पाहिजे, अशी येथील रहिवाशांची दुसरी मागणी होती. पूर्वीच्या चर्चेत चार घरांमागे एक पार्किंग देऊ अशी अट होती. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी समजावून सांगितले आणि प्रत्येकाला कार पार्किंग द्यावी, असाही निर्णय झाला. त्याचबरोबर कॉरपस फंडाबाबत बोलणे करावे आणि योग्य तो कॉरपस व्यवहार्यतेनुसार द्यावा, असा फेडरेशन आणि रहिवाशांना अपेक्षित असलेला निर्णय फडणवीसांनी घेतला,” अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.
 
फडणवीसांसोबतच्या बैठकीत हे ठरले
 
- ५०० ऐवजी ६३५ चौ. फुटांचे घर
- ३ हजार, ४०९ कुटुंबांना २५ वर्षांनी न्याय
- ३३ एकराच्या परिसरात ४८ इमारतींचा पुनर्विकास
- प्रत्येक घरामागे एक पार्किंग
 
देवेंद्र फडणवीस मराठी माणसांचे तारणहार!
 
“अभ्युदयनगर पुनर्विकासाचा प्रश्न सोडवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठी माणसाचे तारणहार आहेत, असे त्यांनी सिद्ध केले आहे,” अशा शब्दांत भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना अभ्युदयनगर पुनर्विकासाची फाईल धूळ खात होती. त्याआधी काँग्रेसचे सरकार असतानाही येथील रहिवाशांना न्याय मिळाला नाही. या वसाहतीचा ‘सी अ‍ॅण्ड टी’च्या मार्फत पुनर्विकास करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली. यात पुढील प्रक्रिया पार पडत असताना अनेक बैठका ‘म्हाडा’ स्तरावर झाल्या. त्यात ५०० चौ. फुटांच्यावर जाता येणार नाही, अशी चर्चा झाल्याने अभ्युदयनगरमधील रहिवासी संभ्रमित झाले. त्यामुळे मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फेडरेशनच्यावतीने विनंती केली आणि त्यांनी तत्काळ अभ्युदय फेडरेशनसोबत बैठक लावली. ६३५ चौरस फुटांहून अधिक जागा देता येईल, अशा प्रकारे टेंडर काढावे, असे निर्देश त्यांनी दिले. हा क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय आहे,” असे दरेकर म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121