ठाण्यातील काही भागात शुक्रवारी २४ तास पाणी नाही

    19-Sep-2024
Total Views |
 
water reduction
 
 ठाणे, दि.१९ : प्रतिनिधी : (Thane)ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा - मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास (एमआयडिसी) महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. एमआयडिसीच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी, ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा शुकवार दि.२० सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी बंद राहणार आहे.
 
सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता), कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तेव्हा, पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.