"बिग बॉसचे ४ सीझन गाजले नाहीत", केदार शिंदेंच्या वक्तव्यावर नेटकरी नाराज, म्हणाले, "रितेशच्या जागी पुन्हा..."

    18-Sep-2024
Total Views |
 
kedar and ritesh
 
 
 
 
मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहेत. पण या पाचव्या सीझनचं कौतुक होण्यापेक्षा प्रेक्षक या सीझनलला ट्रोल अधिक करत आहेत. बिग बॉस मराठीच्या या पाचव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना अनेक सरप्राईज मिळाले. अगदी नव्या होस्टपासून ते घरातील सदस्यांच्या अनपेक्षित स्वभावापर्यंत. या पर्वाने टीआरपीचेही अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. बिग बॉस मराठीच्या आधीच्या पर्वांनाही प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं. त्यामुळेच पाचव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण, कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदें यांचं मत जरासं वेगळं आहे.
 
केदार शिंदे यांनी नुकतीच अमोल परचुरे यांच्या कॅच अप या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत बिग बॉस बद्दल अनेक खुलासे केले. शिंदे म्हणाले की, "बिग बॉस मराठीचे चार सीझन जे झाले ते लोकांना आवडले असतील. पण, ते गाजले नव्हते". केदार यांच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी मात्र कमालीची नाराजी व्यक्त केली आहे. या मुलाखतीच्या प्रोमो व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत केदार शिंदे यांना खडेबोल सुनावले आहेत.
 
नेटकरी म्हणाले की "केदार शिंदे तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती. हा सीझन फार अनफेअर आहे. रितेश देशमुख यांच्या जागी महेश मांजरेकरांना परत आणा.. डायलॉगबाजी तरी जरा कमी होईल...", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे की "याउलट आताचा जास्त गाजत नाहीये", असं म्हटलं आहे. "पहिले चार सीझन आम्ही आज पण बघतो, कारण त्यातले स्पर्धक निक्कीसारखे नव्हते","सहमत नाही...पहिला आणि तिसरा सीझन सुपरहिट होता", अशा कमेंट्स करत चाहत्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
 
दरम्यान, पाचवा सीझन सुरु झाल्यापासून रितेश देशमुख यांच्या होस्टींगची तुलना यापुर्वीचे बिग बॉसचे होस्ट महेश मांजरेकर यांच्यासोबत वारंवार केली जात होती. यावरही केदार शिंदे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, "महेश दादा आणि रितेश देशमुख यांची तुलना होणारच होती. पण, एक लक्षात ठेवा की सुनील गावस्कर चांगलाच खेळायचा पण सचिन तेंडुलकरही वाईट खेळत नव्हता". पण सध्यातरी केवळ निक्की तंबोळी हिला बिग बॉसची ट्रॉफी जिंकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत असे तरी दिसून येत आहे. कारण, जर का कार्यक्रमाचे होस्ट म्हणत असतील की या शोची सर्व सुत्र महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या हातात आहेत तर त्यांच्या म्हणण्याला आणि त्यांच्या टीकेला गांभीर्याने घेतले जात नसल्याचेही दिसून येत आहे.