४ अंतराळवीर पृथ्वीवर परतले; ड्रॅगन अंतराळयान पाण्यात उतरले
16-Sep-2024
Total Views |
वॉशिंग्टन : (Elon musk) स्पेस एक्सचे पोलारिस डॉन क्रू रविवार, दि. १५ सप्टेंबर रोजी पृथ्वीवर परतले. ड्रॅगन स्पेसक्राफ्ट फ्लोरिडाच्या ड्राय टॉर्टुगास कोस्टवर दुपारी १.०६ वाजता उतरले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना अंतराळयानाचा वेग ताशी २७ हजार किमी होता. हवेशी संपर्क झाल्याने घर्षण निर्माण झाले आणि तापमान १ हजार, ९०० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
एलॉन मस्क यांच्या कंपनीच्या ‘फाल्कन-९’ रॉकेटमधून दि. १० सप्टेंबर रोजी ‘पोलारिस डॉन मिशन’चे प्रक्षेपण करण्यात आले. या पाच दिवसांच्या मोहिमेत, चार अंतराळवीर कक्षेत गेले होते. कोणत्याही अंतराळमोहिमेचा सर्वात कठीण भाग म्हणजे पृथ्वीवर परतणे. सुरक्षितपणे घरी पोहोचण्यासाठी क्रू ड्रॅगन कॅप्सूलने डी-ऑर्बिट बर्न सुरू केले. या यानाने पृथ्वीच्या वातावरणात सुमारे २७ हजार किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवेश केला. हवेशी संपर्क झाल्याने घर्षण निर्माण झाले आणि तापमान १ हजार, ९०० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या खाली चार मीटर रुंद हीटशील्ड अंतराळवीरांना या तापमानापासून सुरक्षित ठेवते. अंतराळयान जसजसे खाली उतरले तसतसा त्याचा वेग मंदावला.
त्याचा वेग आणखी कमी करण्यासाठी पॅराशूट उघडून पाण्यात उतरवण्यात आले. विशेष बोटीवर बचावपथक आधीच तेथे उपस्थित होते. अंतराळवीरांना कॅप्सूलमधून काढण्यापूर्वी, बचावपथकाने अंतिम सुरक्षा तपासणी केली, त्यानंतर त्यांना पाण्यातून जमिनीवर नेले.
दोन अंतराळवीरांचा ७०० किमीवर स्पेसवॉक
या मोहिमेचा उद्देश पहिला खासगी बाह्य वाहन क्रियाकलाप (स्पेसवॉक) होता. याशिवाय मानवी आरोग्याशी संबंधित ३६ संशोधने आणि प्रयोगही या अभियानात करण्यात आले. दि. १२ सप्टेंबर रोजी दोन अंतराळवीरांनी पृथ्वीपासून सुमारे ७०० किलोमीटर अंतरावर स्पेसवॉक केला. मिशन कमांडर जेरेड इसेकमन आणि मिशन स्पेशालिस्ट सारा गिलीस सुमारे दहा मिनिटे स्पेसवॉकसाठी बाहेर पडले. स्पेसवॉकनंतर, अंतराळयानाची हॅच बंद झाली. स्पेसवॉकच्या वेळी अंतराळयानाचा वेग ताशी २५ हजार किमी होता.