मुंबई : (Bangladesh) बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळावा, यासाठी बांगलादेशातील हिंदूंनी एकत्र येत बांगलादेशची राजधानी ढाका आणि बांगलादेशचे प्रमुख आर्थिक केंद्र असलेल्या चट्टोग्राम येथे मोर्चा काढला. हिंदूंवर अन्याय करणार्यांचा न्याय जलदगतीने व्हावा, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली. तसेच, अल्पसंख्याक मंत्रालयाच्या निर्मितीची मागणीदेखील यावेळी करण्यात आली. शेख हसीना यांची बांगलादेशच्या पंतप्रधानपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर, बांगलादेशातील हिंदूंवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करण्यात आले होते. त्यानंतर बांगलादेशातील काळजीवाहू सरकारचे प्रमुख असणार्या मोहम्मद युनूस यांनीदेखील धार्मिक सलोखा राखण्याचे आवाहन बांगलादेशातील नागरिकांना केले होते.
त्यानंतर बांगलादेशातील हिंदूनी त्यांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने भव्य आंदोलनाची सुरुवात केली. या आंदोलनाचा भाग म्हणूनच बांगलादेशची राजधानी ढाका आणि बांगलादेशचे प्रमुख आर्थिक केंद्र असलेल्या चट्टोग्राम येथे मोर्चा काढला. त्यावेळी अल्पसंख्याक कायद्यांची पूर्ण अंमलबजावणी करण्याची मागणी हिंदूंनी केली. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मागे न फिरण्याचा निर्धारदेखील बांगलादेशातील हिंदूंनी व्यक्त केला. तसेच आंदोलन करणार्या हिंदूंना एजंट म्हणून हिणवणे चुकीचे असून, आम्ही बांगलादेशातील मूळ रहिवासी आहोत. इथे आम्ही आमच्याच देशात, आमच्या न्याय्य हक्कांसाठी लढत असून, कोणाच्याही सांगण्यावरून हे आंदोलन केलेले नसल्याचेदेखील या आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. तसेच बांगलादेशातील अल्पसंख्याकांची अवस्था लक्षात घेऊन, तत्काळ अल्पसंख्याक मंत्रालयाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणीदेखील यावेळी संघटित हिंदू आंदोलकांनी केली.
दहशतवादी रहमानीची पश्चिम बंगालच्या मुक्ततेची मागणी!
बांगलादेशातील अन्सारुल्ला बांगला टीम या ‘अल कायद्या’शी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेल्या रहमानी याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांना मोदींच्या राजवटीतून पश्चिम बंगालला स्वतंत्र करण्याची मागणी केली आहे. तसेच भारताविषयी गरळ ओकली आहे. रहमानी याने याआधीही भारत-पाकिस्तान वादावर आझाद काश्मीरचा राग आळवला होता. रहमानी गेली पाच वर्षे तुरुंगात होता, त्याची काळजीवाहू सरकारने मुक्तता केली होती.