व्हीआयपी रांगेतून नव्हे, तर सर्वसामान्यांबरोबर घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
प्रसिद्ध अभिनेत्याचे नेटकऱ्यांकडून कौतुक
15-Sep-2024
Total Views | 161
मुंबई : गणेशोत्सवात भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरणाऱ्या लालबागच्या राजा (Lalbaugcha Raja) ची ख्याती सर्वत्र आहे. त्याच्या दर्शनासाठी केवळ राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून सर्वसामान्यांपासून ते अनेक मोठमोठे सिनेकलाकार, राजकीय प्रमुख नेते मंडळींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी येत असतात.
गणेशोत्सवामध्ये लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी मोठमोठाल्या रांगा लागलेल्या असतात. सर्वसामान्य भाविक नऊ-दहा तास तर कधीकधी त्याहून जास्त वेळ रांगेत उभे राहून बाप्पाचे दर्शन घेतात. मात्र सेलिब्रिटींना रांग न लावता व्हीआयपी दर्शनाचा लाभ घेत अवघ्या काही क्षणात बाप्पाचे दर्शन घेता येते. सर्वसामान्यांना बाप्पाच्या चरणावर एक सेकंदही माथा टेकवू दिला जात नाही परंतु हेच सेलिब्रिटींना तिथे उभे राहून फोटो काढण्याचीही मुभा मिळते, अशी अनेकांची तक्रार आहे. अशातच एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सर्वसामान्यांच्या रांगेतून लालबागच्या राजाचे दर्शन घेत नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून रणदीप हुड्डा आहे. रणदीप हा आताच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो त्याच्या अभिनयासह कामाप्रती असणारी निष्ठा व समर्पण तसेच त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो. सर्व सेलिब्रिटी मंडळी रांगेत उभे न राहता थेट बाप्पाच्या चरणापर्यंत जाऊन दर्शन घेत असल्याने सर्वसामान्य भाविक आणि सेलिब्रिटी यांच्यातील हा फरक सध्या सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे.
अशातच सर्वसामान्य भाविकांसोबत दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या रणदीपचा आणि त्याची पत्नी लिनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुक्रवारी रणदीप सपत्नीक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला होता. तिथे त्याने व्हीआयपी प्रवेश न निवडता, सर्वसामान्य भाविकांबरोबर रांगेत उभे राहून बाप्पाचे दर्शन घेतले. रणदीपच्या याच कृतीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.