काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वंदे भारत ट्रेनचे नुकसान
नव्या डब्यांची दगडफेक करत तोडफोड
14-Sep-2024
Total Views |
रायपूर, दि.१४ : प्रतिनिधी : छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यामध्ये वंदे भारत (Vande bharat) एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. बागबाहरा रेल्वेस्टेशन जवळ वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत ट्रेनच्या तीन डब्यांचे नुकसान झाले आहे. या ट्रेनची शुक्रवार, दि.१३ रोजी रायपूर ते विशाखापट्टणम दरम्यान चाचणी घेण्यात आली होती. दरम्यान, विशाखापट्टणम येथून परतताना या ट्रेनवर दगडफेक करण्यात आली.
ट्रेनच्या C२-१०, C४-१, C९-७८ या तीन डब्यांच्या काचा फुटल्या. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तपास करत पाच आरोपींना अटक केली आहे. पाचही आरोपी बागबहरा येथील रहिवासी आहेत. शिवकुमार बघेल, देवेंद्र कुमार, जितू पांडे, सोनवणी आणि अर्जुन यादव अशी पाच आरोपींची नावे आहेत. आरपीएफ पोलीस रेल्वे कायदा १९८९ नुसार गुन्हा नोंदवून आरोपींना रेल्वे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हे पाचही आरोपी काँग्रेसपक्षाशी संबंधित आहेत. याप्रकरणात दगडफेक करणाऱ्यांपैकी शिवकुमार बघेल हे काँग्रेसचे खिल्लारी विधानसभा अध्यक्ष असून ते काँग्रेस नेते ताम्रवल ध्वज यांचे भाऊ असल्याची माहिती आहे.
आरपीएफ अधिकारी परवीन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “वंदे भारत ट्रेनची ट्रायल रन होती जी १६ तारखेपासून धावणार आहे. ही ट्रेन सकाळी ७.१० वाजता महासमुंद येथून निघाली आणि ९ वाजण्याच्या सुमारास बागबहराजवळ काही समाजकंटकांनी चालत्या गाडीवर दगडफेक केली. ट्रेनमध्ये उपस्थित असणाऱ्या रेल्वे पोलिसांनी याची माहिती कळवताच एका पथकाने तातडीने जाऊन तपास केला आणि पाच आरोपींना अटक करण्यात आली. हे पाचही बागबहरा येथील आहेत.”