वडेट्टीवार-धानोरकर वाद पुन्हा उफाळला? दिल्ली दरबारी बैठक होणार
14-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली : विदर्भातील काँग्रेस नेते खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद पुन्हा उफाळला असून यावर तोडगा काढण्यासाठी दिल्ली दरबारी बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या वादावर आता तोडगा निघतो का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद सर्वपरिचित आहे. मात्र, आता या दोघातील वाद दिल्ली दरबारी पोहोचला आहे. त्यामुळे त्या दोघांनाही दिल्लीला बोलवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच या वादावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.
चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवरूनही विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. वडेट्टीवार आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते. तर प्रतिभा धानोरकर स्वत: लढण्यास इच्छूक होत्या. त्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मध्यस्ती करत विजय वडेट्टीवारांना एक तर तुम्ही लोकसभा लढवा अन्यथा धानोरकर यांना उमेदवारी द्या, असं सांगितलं होतं. वडेट्टीवारांनी माघार घेतल्यावर प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यानंतरही धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार यांच्यातील वाद कायम राहिला.