जरांगेंच्या पाठीमागे कोण? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

    14-Sep-2024
Total Views |
 
Jarange & Bhujbal
 
मुंबई : अंतरवाली सराटीमध्ये दगडफेक आणि लाठीचार्ज झाल्यानंतर मनोज जरांगे तिथून निघून गेले होते. पण राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी त्यांना पुन्हा तिथे आणून बसवलं, असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळांनी केला आहे. तसेच जरांगेंसारख्या माणसांना आम्ही भीक घालत नाही, असेही ते म्हणाले.
 
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "अंतरवाली सराटीमध्ये दगडफेक आणि लाठीचार्ज झाल्यानंतर जरांगे तिथून निघून गेले होते. रात्री २ वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार रोहित पवार आणि राजेश टोपेंनी त्यांना परत तिथे आणून बसवलं. त्यानंतर त्यांनी शरद पवारांना तिथे नेलं. शरद पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले. तिथे मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दगडफेक झाली आणि ८० पोलिस जखमी झाले. त्यामुळे स्वत:च्या संरक्षणासाठी लाठीहल्ला करण्यात आला, याची पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना कल्पना नव्हती. यामध्ये रोहित पवार आणि राजेश टोपेचा हात आहे, असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. पोलिसांवर अशा प्रकारची दगडफेक झाली हे माहित आधी असतं तर कदाचित पवार साहेब तिथे गेलेही नसते आणि ते गेले नसते तर उद्धव ठाकरेसुद्धा गेले नसते," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  मविआचा फॉर्म्युला ठरला? कोण किती जागा लढणार? वाचा सविस्तर...
 
आम्ही जरांगेंना भीक घालत नाही!
 
"छगन भुजबळने काय दंगली घडवल्या? छगन भुजबळ काहीच मागत नाहीत. तुम्हीच दंगली घडवता. बीड कोणी पेटवलं? आमदारांच्या घराला कुणी आगी लावल्या? हॉटेल, शैक्षणिक संस्था आणि शरद पवार साहेबांचं ऑफिस कुणी पेटवलं? तुम्हीच ही गुंडगिरी करणारे लोकं आहात. यावरून तुम्ही काय लायकीची माणसं आहात हे लक्षात येतं. आज उपोषण, उद्या उपोषण अशी जरांगेंची नाटकं सुरुच राहणार. आम्ही त्याला भीक घालत नाही. सरकारने या दंगलीची सखोल तपासणी करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. हळूहळू सगळं बाहेर येईल. या सगळ्यामागे कुणाचं डोकं आहे हे आपोआपच बाहेर येईल," असेही ते म्हणाले.