तब्बल ९ वर्षांनी एसटी महामंडळ नफ्यात! ऑगस्ट महिन्यात ३१ पैकी २० विभागांनी कमावला नफा
13-Sep-2024
Total Views | 64
मुंबई : तब्बल ९ वर्षांनंतर प्रथमच एसटी महामंडळ नफ्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात ३१ पैकी २० विभागांनी नफा कमावला असून या महिन्यात एसटी महामंडळाचा १६ कोटी ८६ लाख, ६१ हजार रुपये इतका नफा झाला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक परिपत्रक जारी करत याबद्दलची माहिती दिली.
दोन वर्ष असलेल्या कोरोना महामारीमुळे आणि त्यानंतर दीर्घकाळ चाललेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला अनेक आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. परंतू, मे २०२२ पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत देणाऱ्या योजना सुरु केल्या. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.
तसेच गेल्या वर्षभरात एसटी प्रशासनाने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तिथे त्या वळवण्यात आल्या. या सर्व प्रयत्नांमुळे ऑगस्ट महिन्यामध्ये एसटी महामंडळाला १६ कोटी, ८६ लाख, ६१ हजार इतका नफा प्राप्त झाल्याची माहितीही महामंडळाकडून देण्यात आली आहे.