ट्रम्प विरुद्ध हॅरिस : अध्यक्षीय वादविवादात कुणाची बाजी ?

    12-Sep-2024
Total Views |

trump harris
 
 
 
वॉशिंग्टन डीसी : अमेरीकच्या अध्यक्षपदासाठी येत्या नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. अशातच बहुप्रतिक्षित,अध्यक्षीय वादविवाद हा डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे डोन्लाड ट्रम्प यांच्यामध्ये ११ सप्टेंबर रोजी पार पडला. या वादविवादानंतर, समाज माध्यमांवर प्रतिक्रियांची आणि विश्लेषणांची लहर अनुभवायला मिळाली. काही टिकाकारांच्या मते, कमला हॅरिस यांच्या बाजूने पक्षपात केला गेला असून, ट्रम्प यांनी देखील याची पुष्टी केली आहे.

कुणाचा झाला विजय ?

दर्शकांमध्ये आयोजित केलेल्या CNN फ्लॅश सर्वेक्षणानुसार, कमला हॅरिस यांनी निर्णायकपणे आघाडी घेतली असून, ६३% नोंदणीकृत मतदारांनी त्यांना विजयी घोषित केले आहे. दरम्यान, ट्रम्प यांना केवळ ३७% प्रतिसादकर्त्यांनी पसंती दिली आहे. अनेक प्रतिसादकर्त्यांना हा निकाल दोन उमेदवारांमध्ये समान रीतीने विभाजित होईल, अशी अपेक्षा होती. या पूर्वी देखील, जो बिडेन आणि हिलेरी क्लिंटन या प्रतिस्पर्धींशी अध्यक्षीय वादविवाद करत असताना ट्रम्प यांना संघर्ष करावा लागला आहे.

अपक्ष मतदारांमध्ये हॅरिस यांची सरशी.

वादविवादानंतर, हॅरिस यांची अनुकूलता वाढून, ४५ टक्यांवर पोहोचली आहे. तर दुसऱ्याबाजूला ट्रम्प यांची मात्र पिछेहाट होऊन, त्यांची अनुकूलता ३९ टक्यांवर आली आहे.सर्वेक्षणात असेही आढळून आले आहे की, कुठल्या उमेदवाराला अमेरिकन लोकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या कळतात, यावर मतदारांची विभागणी असून ४४% लोकांनी हॅरिस, तर ४०% लोकांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला. त्याच बरोबर, ८२% प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की या वादविवादाचा त्यांच्या उमेदवाराच्या निवडीवर कुठलाही परिणाम झाला नाही. तर १४% लोकांनी असे सूचित केलं की ते त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करू शकतात; परंतु कदाचित त्यांचे मत बदलणार नाही. मतदान केलेल्यांपैकी केवळ ४% लोकांनी वादविवादाचा प्रभाव मतदानावर होईल असे सुचित केलं. 

ट्रम्प यांची अर्थिक आघाडी

हॅरिस यांनी काही भागात प्रगती केली असली तरीही, ट्रम्प यांनी अर्थव्यवस्था हाताळण्याबद्दल मतदारांचा विश्वास कमावला आहे. CNN सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की ५५ % उत्तरदात्यांनी ट्रम्प यांच्या कार्यशैलीला पसंती दर्शवली असून कमला हॅरिस यांच्या मागे हा आकडा केवळ ३५ % इतकाच आहे. वादविवादानंतर हे अंतर किंचित वाढले असून याचा अर्थ ट्रम्प यांचा आर्थिक संदेश अजूनही अनेक मतदारांना पसंत आहे.