जाणून घ्या श्रीगौरीपूजनाचे महत्त्व

    11-Sep-2024
Total Views | 37

GAURI
 
श्रीगणेशचतुर्थी नंतर वेध लागतात ते गौरी आवाहनाचे. अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन तर मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करण्याची परंपरा आहे. तीन दिवस चालणार्‍या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून समस्त स्त्रीवर्ग आपले सौभाग्य अक्षय रहावे म्हणून श्रीगौरीमातेला शरण गेला. मनोभावे तिची प्रार्थना केली तेव्हा श्रीगौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील सर्व जीवांचे रक्षण केले. म्हणून अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठा गौरीपूजन करतात.
 
गौरी पूजन म्हणजे साक्षात महाशक्तीचे पूजन होय. हीच महाशक्ती म्हणजे माता पार्वती जी देवाधिदेव महादेवांची शक्ती आहे. सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आवाहन, पूजन केल्यास घरात भरभराट, आनंद आणि ऐश्वर्य येते, असे म्हटले जाते. सीतामातेने गौरी पूजन करून महाशक्तीचा वरदहस्त मिळवला होता, असा उल्लेख तुलसी रामायणात आहे. लक्ष्मी, महालक्ष्मी, ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी अश्या वेगवेगळ्या नावांनी ती प्रचलित आहे. आपण तिला आदिमाता म्हणतो कारण ती या सृष्टीची रक्षणकर्ती आहे. तिचे आवाहन, पूजा व विसर्जन विधीवत झाले की ती भरभरून आशिर्वाद देते त्यामुळेच घराघरात आता गौरीपूजनाची तयारी सुरु असेल.
 
श्रीगौरीपूजन
 
गौरी आवाहनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन केले जाते. माहेरवाशीण गौराईसाठी पंचपक्वानांचा बेत करुन तिचा पाहुणचार केला जातो, सकाळी गौरींची पूजा-आरती करून फराळाचा (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवतात. संध्याकाळच्या आरती नंतर पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाड्याची भाजी, दिवेफळ, शेंगदाणा - डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने करतात. पुरणाच्या १६ दिव्यांनी आरती करतात. महाराष्ट्रात काही जागी सायंकाळी महिलांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
 
ओवसा - सौभाग्याचे व्रत
 
गौरी पूजनातील एक महत्त्वाची परंपरा म्हणजे ओवसा, कोकणात खास करून ही प्रथा अजूनही जपलेली आहे. नववधूंसाठी पहिला ओवसा फार महत्त्वाचा असतो. 'ओवसा' म्हणजे ओवासणे किंवा ओवाळणे. गौरीचा ओवसा करण्याची पद्धत पुरातन काळापासून सुरू आहे. कोकणातल्या बोलीभाषेत याला ववसा असेही म्हणतात. गौरीला ओवासणे हे एक सुवासिनीनी करावयाचे एक मंगल सौभाग्य व्रत आहे
 
नवीन लग्न झालेल्या सुवासिनी गौरीला ओवसायला येतात. सोन्याचे मणिमंगळसूत्र, चांदीची जोडवी, खण, नारळ, तांदूळ, पानाचा विडा, सुपारी, हळकुंड, अक्रोड, बदाम, खारीक, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारच्या मिठाई, पाच भोपळ्याची पानें इत्यादी वस्तूंनी नवीन सूप सजवून सुवासिनी ते गौरीभोवती पाच वेळा ओवाळतात. नंतर ते सूप गौरीच्या समोर ठेवतात. गौरीला नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा सांगतात. ओवसायला आलेल्या त्या सुवासिनींची खणानारळाने ओटी भरली जाते आणि त्यांचा मान-सन्मान केला जातो. काही ठिकाणी सुवासिनींच्या सूपात काही पैसे किंवा भेटवस्तू ठेवण्याची प्रथा आहे.
 
श्रीगौरी विसर्जन
 
तिसऱ्या म्हणजे विसर्जनाच्या दिवशी तिला खीर- कानवल्याचा (करंजीचा प्रकार मुरड घालुन करतात, मुरडून ती परत यावी म्हणून) नैवेद्य दाखवून तिची पाठवणी करतात. श्रीगौरीपूजना इतकेच महत्त्व तिच्या विसर्जनाला आहे. तिचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे. विसर्जनाच्यावेळी दहीभाताचा नैवैद्य केला जातो. यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो. कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121