
वॉशिंग्टन डीसी : अॅप्पलच्या आयफोन १६ या स्मार्टफोन लाँचींगच्या दरम्यान, अॅप्पलचे सीईओ टीम कूक यांचा एआयने तयार केलेला व्हिडिओ प्रसारीत झाल्याची घटना घडली आहे. 'ग्लोटाइम' या कार्यक्रमादरम्यान नेटकऱ्यांना हा अनुभव आला आहे. सदर लाईवस्ट्रीम व्हिडिओ मध्ये अॅप्पलचे सीईओ टीम कूक, लोकांकडून "बिटकॉइन"ची मागणी करताना दिसत आहेत.
एकाच वेळेला, बनावट एआय निर्मीत टीम कूक यांचा व्हिडिओ आणि अधिकृत लाईवस्ट्रीम सुरु असल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. बनावट स्ट्रीमला देखील लाखो दर्शक असल्यामुळे प्रचंड गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. या बद्दलचे वास्तव लक्षात येताच, बनावट स्ट्रीमची माहिती देत, नेटकऱ्यांनी लोकांना जागृत केलं व खोट्या मागणीला बळी पडू नये असं आवाहन सुद्धा केलं. सदर घटनेबद्दल अॅप्पलने अद्याप भाष्य केलेलं नाही.
ही पहिलीच वेळ नाही ?
अशा पद्धतीचे एआय निर्मीत लाईव स्ट्रीम व्हिडिओ प्रसारीत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मोठ्या इव्हेंटचा फायदा घेत, लोकांना आकर्षित करुन, त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम क्रिप्टो घोटाळ्यांच्या अंतर्गत केलं जात आहे. सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमा वापरुन, ते एका नवीन क्रिप्टोकरन्सी उपक्रमाला मान्यता देत असल्याचा भ्रम निर्माण केला जातो. हे घोटाळे सामान्यत: चालू असलेल्या कार्यक्रमाची माहिती असलेल्या, परंतु अधिकृत प्रवाहांशी थेट संलग्न नसलेल्या व्यक्तींना लक्ष्य करतात. आता देखील कूक यांच्या जुन्या मुलाखतीचा वापर करत, भ्रम निर्माण केला गेला आहे.