गणेशोत्सवाच्या देखाव्यातून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेविषयी जनजागृती
ठाण्यातील सांस्कृतिक मंडळाचा अनोखा उपक्रम
10-Sep-2024
Total Views |
मुंबई : गणेशोत्सवामध्ये विविध उपक्रमांतर्गत नवनवीन संकल्पना आकर्षक देखाव्यांच्या स्वरुपात आपल्याला पहायला मिळतात. अश्याच प्रकारचा एक जनहितार्थ उपक्रम ठाणे येथील विहंग गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळाने यंदाच्या वर्षी हाती घेतला आहे. शासकीय योजनांचा प्रचार - प्रसार करणे तसेच गरजू नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.
जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने स्थापन केलेल्या या गणेशोत्सव मंडपात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेच्या प्रचारासाठी देखावास्वरुप विविध आकारांचे मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत. याठिकाणी अनेक भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येतात. त्यांना दर्शनासोबतच या योजनेचीही माहिती मिळावी, असे मंडळाचे संयोजन आहे.
या अशा उपक्रमांमुळे सरकारी योजनांबद्दल जनमानसांत जागृती निर्माण करण्यास मदत होते. यासाठीच संस्थेचे अध्यक्ष विजय बारहाटे, सचिव भूपेंद्र मिस्री, कोषाध्यक्ष डॉ. विजय पवार व अन्य पदाधिकाऱ्यांनी मिळून सर्व सदस्यांच्या सहकार्याने खूप मेहनत घेतली आहे. आज ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आणि महिला व बाल विकास विभागाने या उल्लेखनीय उपक्रमासाठी विहंग गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड आणि जिल्हा सूचना अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी इतर सामाजिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळांनीही या अशा प्रकारच्या उपक्रमाचा अवलंब करावा, असे आवाहन केले आहे.