नविन रेल्वे स्थानक प्रकल्पाचा खर्च ६४ कोटींनी वाढला

प्रकल्पाची डेडलाईन लांबली; दीड ते दोन वर्षात नविन स्थानक

    09-Aug-2024
Total Views | 20
new railway station project expenditure


ठाणे :      केंद्र व राज्य सरकार आणि ठाणे महापालिकेच्या प्रयत्नामुळे मनोरुग्णालयाच्या सुमारे १४ एकर जागेवर ठाणे आणि मुलुंड दरम्यान होत असलेल्या विस्तारीत नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्रकल्पाचा खर्च ६४ कोटींनी वाढला आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या नविन स्थानकाचे काम पूर्ण होण्यासाठी दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

ठाणे मनोरूग्णालयाच्या जागेत ठाणे स्मार्ट सिटीतंर्गत नवीन रेल्वे स्थानक बांधण्यात येत आहे. २०१८ पासून या प्रकल्पाला सुरुवात झाली असून आतापर्यंत केवळ ४० टक्के या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल असा दावा करण्यात आला होता. मात्र आता या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दीड ते दोन वर्ष लागणार असल्याचा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकल्पात ३.७७ एकर जमिनीवर रेल्वे काम करणार असून १० एकरवर ठाणे महापालिका काम करणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३२७ कोटींचा असून यामध्ये ठाणे महापालिका १४२ कोटी तर रेल्वेकडून १८५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.२०१८ साली या प्रकल्पाचा खर्च हा २६३ कोटी अपेक्षित धरण्यात आला होता. मात्र आता यामध्ये ६४ कोटींची वाढ झाली असून हा खर्च ३२७ कोटींवर गेला आहे.


स्थानका आड येणाऱ्या झोपड्यांचे सर्व्हेक्षण लवकरच

नविन रेल्वे स्थानकाच्या आड येणाऱ्या तब्बल १७० झोपडयांच्या सर्व्हेक्षणाला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.पावसाळ्यानंतर या सर्व झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.धर्मवीर नगर म्हणून हा परिसर ओळखला जात असून या झोपड्या हटवल्यानंतर विस्तारित रेल्वे स्थानकाच्या कामाला गती मिळणार आहे.


नवीन रेल्वे स्थानक असे असेल
 
नविन रेल्वे स्थानक १४.८३ एकर जागेवर होणार असून त्यापैकी ३.७७ एकर जागेवर रेल्वे रूळ व तळमजला अधिक दोन मजली इमारत उभी राहणार आहे हे काम रेल्वे करणार आहे.या स्थानकांवर एकूण तीन फलाटांपैकी एक होम प्लॅटफॉर्म आणि तीन पादचारी पुल असणार आहेत. परिचालन क्षेत्राचे काम ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून होत आहे. स्थानकाच्या इमारती समोर १५० मीटर लांब व ३४ मीटर रुंद असा सॅटिस डेक असणार आहे. तर २.५ एकर जागेमध्ये २५० चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पार्किंग आहे.


स्थानकाला जोडणाऱ्या तीन मार्गीका

- पहिली मार्गिका नविन ज्ञानसाधना कॉलेजच्या मागून अप -डाऊन असणार आहेत त्या पूर्वद्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहेत.
- दुसरी मार्गिका जुने ज्ञानसाधना कॉलेज मार्गावर अपडाऊन असणार आहे.
- तिसरी मार्गिका मुलुंड चेक नाका मार्गे बाहेर पडणारी अपडाऊन असणार आहे.


नविन स्थानकाचे फायदे

- नवे ठाणे स्थानक उभारल्याने या स्थानकामध्ये मुंबईला जाणाऱ्या गाड्या होम प्लॅटफॉर्म वरून सुटणार आहेत. तसेच कर्जत कल्याण च्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्म वरून सुटणार आहेत.
- ठाणे स्थानकातील सुमारे ३१ टक्के आणि मुलुंड स्थानकातील २१ टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121