भारतीय शेअर बाजारात आठवडाभर चढ-उताराची स्थिती; तज्ज्ञांचे मत काय?
09-Aug-2024
Total Views |
मुंबई : गेल्या काही दिवसांत भारतीय शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाले. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण झाली तर आठवड्याच्या शेवटी बाजाराने सावरत मोठी उसळी घेतली आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ८१९.६९ अंकांनी वधारून ७९,७०५.९१ वर स्थिरावला तर निफ्टी ५० देखील १.०४ टक्क्यांनी वधारून २४,३६७.५० वर स्थिरावला आहे.
दरम्यान, अमेरिकेतील मंदीचे सावट, बँक ऑफ जपानने व्याजदरात अचानक वाढ केल्यामुळे या आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात घसरण झाली. तसेच, यूएस आर्थिक डेटाने जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या अर्थव्यवस्थेबाबत मंदीची भीती निर्माण केली. याचा नकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला आहे.
अलीकडील शेअर बाजारातील घसरणीचा मूलभूत कारणांपेक्षा तांत्रिक घटक आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या पैसे काढण्याशी अधिक संबंध आहे, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. जगातील प्रमुख भांडवली बाजारात पडझड झाल्याचे पाहायला मिळाले होते. जपानी शेअर बाजाराचा निर्देशांक निक्केईमध्ये गेले काही दिवस प्रचंड घसरण झाली.